डॉ. महादेव दिनकर इरकर यांना राज्य शिक्षक पुरस्कार !!
विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
शैक्षणिक क्षेत्रात नवकल्पना, शिस्तबद्ध अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेत, विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय, विरार (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर येथे कार्यरत सहाय्यक शिक्षक डॉ. महादेव दिनकर इरकर यांची "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024-25" साठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर केला जातो. यंदा एकूण १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यात माध्यमिक गटातील डॉ. इरकर यांचा समावेश आहे. राज्यस्तरीय निवड समितीने विविध निकषांवर मूल्यांकन करून ही यादी जाहीर केली आहे.
डॉ. इरकर यांनी अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला आहे. नवनवीन अध्यापन पद्धती व सामाजिक जाणीवा यांचा संगम घडवून आणण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या उपक्रमांची विशेष दखल घेण्यात आली आहे.
पुरस्काराच्या रूपात डॉ. इरकर यांना प्रशस्तिपत्रक, मानचिन्ह आणि मानधन प्रदान केले जाणार आहे. हा सन्मान २२ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय समारंभात देण्यात येणार आहे.
डॉ. महादेव दिनकर इरकर यांच्या या यशाबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, माजी युवा आमदार क्षितिज ठाकूर, सचिव अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर ठाकूर, व्यवस्थापन समिती सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस. एन. पाध्ये, समन्वयक नारायण कुट्टी, विवा पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उत्कर्ष विद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले, उपमुख्याध्यापिका चित्रा ठाकूर, उपप्राचार्य रमेश पाटील, हेमा पाटील, समन्वयक कल्पना राऊत, सर्व विषयविभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि स्थानिक समाजाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या कार्यामुळे विद्यालयाला तसेच पालघर जिल्ह्यालाही अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment