ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला ; सर्वोच्च न्यायालय आदेशांकडे महापालिकेचे दुर्लक्ष !!
ठाणे-प्रतिनिधी :
भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास, वारंवार नागरिकांवर होणारे हल्ले आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष याबाबत ठाण्यातील पत्रकार व दक्ष नागरिक श्री. विशाल शांताराम कुरकुटे यांनी आरोग्य विभागाकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे.
दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल झालेल्या या तक्रारीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा (दि. ११ ऑगस्ट २०२५ व १४ ऑगस्ट २०२५) उल्लेख करून, महानगरपालिका प्रशासनाने आजवर त्याची अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तक्रारीतील मुद्दे __
ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून नागरिक, विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनेक घटनांमध्ये नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतले असून, सार्वजनिक आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की सर्व स्थानिक संस्था भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण व जंतनाशन करून त्यांना रस्त्यावर सोडणार नाहीत. तसेच कुत्र्यांसाठी आश्रयस्थाने उभारणे बंधनकारक आहे. तरी देखील ठाणे महापालिकेकडून या आदेशांची अंमलबजावणी झालेली नाही.
कायदेशीर बाजू __
श्री. विशाल शांताराम कुरकुटे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करणे म्हणजे Contempt of Court ठरते. तसेच, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्या नागरिकाला जखम किंवा मृत्यू झाल्यास त्याची थेट जबाबदारी ठाणे महानगरपालिका प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांच्या मागण्या __
१. भटक्या कुत्र्यांची तातडीने पकड मोहीम राबवावी.
२. नसबंदी व लसीकरण करून त्यांना न्यायालयीन आदेशानुसार आश्रयस्थानी ठेवावे.
३. प्रत्येक विभागात कुत्रा आश्रय-गृह उभारावे व आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात.
४. नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करून ४ तासांत कारवाई करावी.
५. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार व नुकसानभरपाई द्यावी.
६. या सर्व कार्यवाहीबाबतचा लेखी अहवाल १५ दिवसांत सादर करावा.
कायदेशीर कारवाईची इशारा __
या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यास उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात Writ Petition व Contempt Petition दाखल करण्याचा इशारा श्री विशाल शांताराम. कुरकुटे यांनी दिला आहे.
या गंभीर विषयावर ठाणे महापालिकेची काय प्रतिक्रिया येते, तसेच प्रशासन भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment