चित्रकार वरद विलास गावंड यांच्या चित्राची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !!
उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) : शायनी कलरने आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धा आणि प्रदर्शनासाठी तरुण चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांचे चित्र निवडले गेले आहे. हे प्रदर्शन २५ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान कर्नाटक चित्रकला परिषद, बेंगळुरू गॅलरी येथे आयोजित केले जात आहे.
वरदच्या 'शहरांच्या पलीकडे', (The Beyond Cities) या चित्र मालिकेतील हे चित्र आदिवासी जीवनशैलीचे सुंदर व्यक्तिचित्र आहे. या चित्रात एका मोहक आदिवासी मुलीचे चित्रण आहे. मुलीच्या ओठांमध्ये दाबलेले गवताचे पाते, वाऱ्यात वाहणाऱ्या तिच्या वेण्या आणि पारंपारिक मणी तिला निसर्गाच्या सौंदर्याचे प्रतीक दिसतात. चित्रकाराने आपल्या अनोख्या शैलीत शहरी जीवनापासून दूर असलेल्या वनजीवनाचे सौंदर्य आणि औत्सुक्य कॅनव्हासवर टिपले आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेच्या परिक्षकांमध्ये प्रसिद्ध चित्रकार विक्रांत शितोळे, आदित्य चारी, प्रफुल्ल सावंत, एम.जी. दोडामणी आणि रश्मी सोनी यांचा समावेश होता. हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी वरदच्या कलाकृती तसेच इतर कलाकारांच्या सर्जनशीलतेचे साक्षीदार होण्याची एक उत्तम संधी आहे.
No comments:
Post a Comment