उरणचा रिक्षावाला ठरला हिरो ; ४० हजारांची थैली परत !!
** प्रामाणिकपणाचा जागला विश्वास
उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) : आजच्या गलिच्छ स्वार्थी दुनियेत, पैशासाठी बापाला दगा देणारे काळ्याकुट्ट चेहरे डोळ्यासमोर येतात. ‘पैसा आला तर माणुसकी मेलं’ हे वास्तव डोळ्यांसमोर घोंगावत असताना उरणच्या रिक्षावाल्याने मात्र पैशावर लाथ घालून प्रामाणिकपणाचा झेंडा फडकावला आहे.
जसखार गावातील एक रुग्ण उपचारासाठी उरणमधील डॉ. सत्या ठाकरे यांच्या रुग्णालयात आला होता. सोनोग्राफीच्या गडबडीत त्याची ४० हजार रुपयांची थैली हरवली. रुग्णाचे हातपाय थरथर कापायला लागले. रुग्णाची ४० हजार रुपयांनी भरलेली थैली गडबडीत हरवली. हतबल रुग्णाच्या छातीत धडधड सुरू… डोक्यावर हात, डोळ्यात पाणी ! एवढ्या पैशाचा पत्ता नाही, आणि रिक्षावाल्याचं नाव-नंबरसुद्धा आठवत नाही ! क्षणात माणसाचं जगणं उद्ध्वस्त होईल असं चित्र उभे राहिले. तर दुसरीकडे थैली मिळणे म्हणजे दिवास्वप्न असल्याचे त्याला वाटत होते. पण, ‘उरणचा सवंगडे’ नावाचा रिक्षावाला देवदूत ठरला.
रिक्षाचालक नंदकुमार सवंगडे यांच्या लक्षात आले की प्रवासी त्यांची थैली विसरून गेला आहे. गरीब असूनही लालच न करता त्यांनी भरलेली थैली तशीच उचलली आणि थेट दवाखान्यात येऊन रुग्णाला ती परत केली. आजच्या काळात पैशाने माणूस विकत मिळतो, पण इथे रिक्षावाल्याने पैशावर लाथ मारून प्रामाणिकपणाला नमस्कार केला.
रिक्षाचालक नंदकुमार सवंगडे हा ‘माणुसकीचा हिरो’ ठरला आहे. भरलेल्या थैलीकडे पाहूनही मनात लालचाची सावलीसुद्धा न येऊ देता सवंगडे थेट रुग्णालयात धाव घेतात आणि ती थैली रुग्णाला परत करतात. गरीबी अंगावर असताना, चार पैशांचा मोह असताना देखील एवढा प्रामाणिकपणा दाखवणं म्हणजे खरोखर मर्दानी धाडस! आजच्या गळपटलेल्या समाजाला सवंगडेंनी आरशातलं खरं रूप दाखवलं आहे.
या प्रामाणिकपणाचा सन्मान उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केला. डॉ. सत्या ठाकरे यांच्या रुग्णालयात त्यांच्या हस्ते संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, सचिव अजित पाटील, ज्येष्ठ पत्रकार आशिष घरत आदींच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
रिक्षावाल्यांचा उल्लेख होताच लोकांच्या डोक्यात ‘उद्धटपणा, अरेरावी, लूटमार’ हे शब्द घुमतात. पण नंदकुमार सवंगडेंनी या प्रतिमेला चक्क चिरडून टाकलं आहे. आजही माणुसकी जिवंत आहे आणि ती उरणच्या रिक्षावाल्याच्या रूपानं उभी ठाकली आहे.
No comments:
Post a Comment