Sunday, 2 November 2025

'नांदणं, नांदणं होतं रमाचं नांदणं' या प्रसिद्ध गीताचे ख्यातनाम गीतकार - प्रकाश पवार

'नांदणं, नांदणं होतं रमाचं नांदणं' या प्रसिद्ध गीताचे ख्यातनाम गीतकार - प्रकाश पवार  

लेखनाची आवड सातत्यपूर्ण जोपासणारे, फुले, शाहू, आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी अनेक गीतांच्या माध्यमातून प्रयत्न करणारे, लेखणीतून सातत्याने प्रबोधन करणारे नांदणं, नांदणं होतं रमाचं नांदणं, दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ मणी यासारखे असंख्य गाण्यांना जन्म देणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजेच दिवंगत लोककवी दिवंगत प्रकाश पवार.

कलेच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्याचा काम आणि महामानवांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे काम कवी, साहित्यिकांनी, कलाकारांनी केले आहे. हालाखीच्या हालखीच्या परिस्थितीतही आपल्या फावल्या वेळेत आपल्या लेखणीच्या जोरावर अनेक गीत लिहून समाजाचे प्रबोधन करणारे कवी, गीतकार म्हणजे दिवंगत कवी प्रकाश पवार.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील 'देवळा' हे त्याचं गावं. १५ ऑगस्ट १९४९ रोजी "देवळा" या एका 
खेड्यागावात त्यांचं जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मात्र लहानपणासूनच लिखाणाची आवड त्यांना होती. त्यावेळी त्यांनी दहावी पर्यंत  शिक्षण घेतले होते. त्यावेळचे दहावीचे शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण समजले जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. पुढे कालांतराने ते कल्याण येथील कोळसेवाडी येथे अनेक वर्ष वास्तव्यास होते. तर काही वर्ष त्यांनी ठाणे, वागले इस्टेट येथील भारत इन्स्लुलन कंपनी मधी त्यांनी काही वर्ष  नोकरी केली. पुढे कालांतराने त्यांनी नोकरी सोडली आणि गाण्याचे कार्यक्रम करू लागले. त्यातूनच मिळालेल्या मानधनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत होते. पवार कुटुंबीय गेली ४७ वर्षापासुन ठाणे जिल्ह्यातील  कसारा येथे (आंबेडकर नगर) येथे वास्तवास आहेत. त्यांच्या लेखणीतून अनेक गीत जन्माला आली आणि त्यातीलच काही  गाणी अजरामर ठरली. झाडाखाली निवांत बसताना, प्रवासात असताना, लग्न समारंभ असेल अशा ठिकाणी आपल्या फावल्या वेळेत प्रकाश पवार 'गाणी' लिहत होते. कवी प्रकाश पवार यांनी "चांडाळ चौकडी" या चित्रपटासाठी "जिवन हे पाण्याचा बुडबुडा" हे गित लिहिले आहे. 'झेंडा फडकस सतरा शिंगीना' हे अहिराणी गित त्यानी लिहिले. सन १९७४ रोजी त्यांनी "बाई सुया घे ग, दाभण घे" हे गित तयार करून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध, ख्यातनाम लोकगीतांचे बादशाह स्वरसम्राट गायक प्रल्हाद शिंदे यांच्या घराण्यातील गायिका रंजना शिंदे यांनी आपल्या कर्णमधुर स्वरांनी हे गीत गायले व मधुकर पाठक यांनी त्या गीताला स्वरबध्द केले. त्यांचे हे लोकगीत संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले. एक ग्रामीण भागाचं वर्णन त्यांनी या गाण्यांमधून केलेले आहे. ग्रामीण भागात सुया, दाभाण विकण्यासाठी जी महिला येते त्या महिलेचं वर्णन त्यांनी या गाण्यातून केलेले आहे. हे गाणं कमालीचं लोकप्रिय ठरलं. आणि आजही हे गाणं मायबाप रसिक प्रेक्षकांच्या ओठावर अधिराज्य गाजवत आहे. 

'दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळंमणी', 'नांदणं, नांदणं होतं रमाचं नांदणं' ,' माझ्या रमाच्या गौरीन , चुल जगाची पेटवली', 'तारिले विश्वाला',' जेव्हा मराठी माणूस भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला', ' वर्गात पहिला ये भीमा तू', व तुझ्या ओल्या वाफ्यामध्ये, पुढे सावित्री सरसावली आग सरणाला लावली', कलिंगची होता हानी. 'मला वाचव वाचव (भ्रूणहत्या) गीत, 'मोट वढतात बैलं नेटानी' अशा अजरामर गीतांसारखी त्यांनी चार हजाराहून अधिक गाणी लिहिली. त्यात बुद्ध, भिमगीत, लोकगीत, भक्तीगीत, कोळीगीत, लग्नगीत, भजन, भारूड, महामानव गीत, प्रबोधन गीत यांचा समावेश असून ही गीते प्रेरणादायी ठरली आहेत. त्यांची अनेक गाणी दिवंगत ज्येष्ठ गायक कलावंत प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, उत्तरा केळकर, रंजना शिंदे , दिनकर शिंदे, शकुंतला जाधव, सुनिल खरे, राजू बागुल, चेतन लोखंडे अशा अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या सुमधुर स्वरांनी स्वरबद्ध केली आहेत. हीच गीते अमर झाली आणि आजही तितकीच प्रभावी आणि प्रबोधक ठरत आहेत.

कसारा येथे त्यांच्या पत्नी ज्योती प्रकाश पवार राहत आहेत. त्यांचा सांभाळ मुलगा सुनिल पवार करत आहेत. काही वर्षापुर्वी त्यांचा सुपुत्र देवदत्त पवार व सुन यांचे निधन झाल्याने घरातील सदस्यांची सांभाळ व देखभाल करण्याची जबाबदारी वयोवृध्द ज्येष्ठ कवी लोककलावंत प्रकाश पवार यांच्यावर आली होती. अशा परिस्थितीवरही मात करत या लोककलावंताने कुणाकडेही हात न पसरता आपले स्वाभिमानी जीवन जगले. असे स्वाभिमानाने जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे कवी, गीतकार प्रकाश पवार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लेखणीतून साकार झालेल्या गीतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार  घराघरांत पोहोचविणारे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी म्हणजे प्रकाश पवार .

कलाकार घरापासून वंचित :  प्रकाश पवार यांचे कुटुंब ठाणे जिल्हातील कसारा येथे पत्र्याच्या घरात अतिशय हलाखीचे जीवन जगत होते. लोककवी दिवंगत प्रकाश पवार यांना घर बांधून देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधींनी पवार यांना सुसज्ज घर बांधून देण्याचे कबूल केले होते.असा त्यांनी शब्द दिला होता. मात्र आजही पवार यांचे कुटुंब घरापासून वंचित असल्याने पवार कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे. आपला लेखणीतून सातत्याने प्रबोधन करणाऱ्या एका कलाकाराच्या परिवाराला घरापासून वंचित राहावे लागले. हे दुर्दैव आहे. म्हणूनच आश्वासनं ही पोकळ आणि फसवी असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

वडिलांचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता. त्याचे राहणीमान अतिशय साधे होते. त्यांच्या अनेक गाण्यातून आम्हाला प्रेरणा मिळते. परिस्थिती जरी गरिबीची असली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर होता. वडिलांनी अनेक गाणी लिहून त्यांनी पवार कुटुंबाला नावारूपाला आणलं असे त्यांचा मुलगा सुनिल प्रकाश पवार यांनी माझ्याशी बोलतांना सांगितले. वडिलांच्या मृत्यूला तीन वर्ष उलटूनही पवार कुटुंबाला घर मिळाले नाही. अशी देखिल खंत सुनिल पवार यांनी माझ्याकडे व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून ते अंथरुणाला खिळले होते. मात्र शेवटी त्यांची मृत्यूशी झुंज संपली आणि ३ नोव्हेंबर २०२२ रोजी लोककवी प्रकाश पवार यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी कसारा येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या मृत्यूला तीन वर्ष उलटूनही पवार कुटुंबाला घर मिळाले नाही. बहुजन आणि वंचित, कामगार चळवळीच्या गाण्यात लोककलेत  प्रकाश पवार यांचा मोलाचा वाटा आहे. अशा महान कलाकाराला त्रिवार अभिवादन...


लेखक - मिलिंद सुरेश जाधव 
रा. पडघा, भिवंडी 
मो. ८६५५५६९४३६

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...