कार्तिकी एकादशी निमित्त दादरमध्ये श्री संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबईतर्फे दिंडी सोहळा संपन्न !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
कार्तिकी एकादशी निमित्ताने आज दादर परिसरात श्री संत कृष्णदास महाराज सत्संग, मुंबई यांच्या वतीने भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मार्केट येथून पालखी प्रस्थान झाली.
दिंडी मार्गामध्ये सेनापती बापट मार्ग, दादर फुल मार्केट, कामत हॉटेल मो.ची.जोगळेकर मार्ग येथे पारंपरिक ‘रिंगण’ घेण्यात आले. त्यानंतर विठ्ठलनामाच्या घोषात पुढील प्रवासाला सुरुवात झाली.त्यानंतर कबूतर खाना, हनुमान गोल मंदिर, रानडे रोड, डी. एल. वैद्य रोड या मार्गावरून विठ्ठलनामाचा गजर करत दिंडीने श्री विठ्ठल मंदिर गाठले. तेथे श्री विठ्ठलाच्या चरणी आरती करून सोहळ्याचा समारोप झाला.
या दिंडी सोहळ्यास फुल मार्केटमधील सर्व व्यापारी, कर्मचारी तसेच श्री संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबईचे भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखीला फुलांची देखणी सजावट करण्यात आली होती. मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तर भक्तांसाठी अल्पोहार म्हणून साबुदाणा खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्री संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबईचे प्रमुख श्री पांडुरंग चौगुले भाऊ, दादर फुल मार्केटचे अध्यक्ष श्री सोपान शेठ दुराफे तसेच संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य भाविक उपस्थित होते. विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तीमय वातावरणात संपूर्ण दादर परिसर हरिभक्तीमय झाला होता.
No comments:
Post a Comment