चिराडपाडा ग्रामस्थांचा विकासासाठी एल्गार! स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावाला बहुमताने मंजुरी !!
विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांची मोठी उपस्थिती; गावाच्या सर्वांगीण विकासाला मिळाला भक्कम पाठिंबा
ठाणे प्रतिनिधी (मिलिंद जाधव) :
गावाच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासाचे ध्येय ठेवत भिवंडी तालुक्यातील चिराडपाडा येथिल ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी एकमुखी निर्णय घेतला आहे. सरपंच रिंकल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद शाळेत आयोजित विशेष ग्रामसभेत स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. एकजुटीने विशेष ग्रामसभा पार पडली, सोमवारी झालेल्या या सभेत ग्रामविकास अधिकारी काशीनाथ माळी आणि ग्रामसेवकांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. गावाच्या भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या महत्वाच्या निर्णयाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकजूट दाखवली. स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी उत्स्फूर्त समर्थन देण्यात आले चिराडपाडा सध्या पिसे–चिराडपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचा भाग आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर गावाला थेट निधी उपलब्ध होईल, विकासकामांची गती वाढेल, तसेच पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अंमलबजावणीला चालना मिळेल, असे ग्रामस्थांनी सांगितले. प्रस्ताव मांडल्यानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याला मंजुरी दिली. ग्रामविकास अधिकारी काशीनाथ माळी यांनी हा प्रस्ताव तातडीने उच्च प्रशासनाकडे पाठविण्याची माहिती दिली असून मंजुरीसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही वेगाने केली जाईल, असे आश्वासन दिले. ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील तरुण आणि महिलांनी केलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावाच्या एकजुटीचा हा निर्धार आता तालुक्यातही चर्चेचा विषय ठरला आहे.स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठीचा चिराडपाडा ग्रामस्थांचा हा ‘एल्गार’ पुढे प्रशासनाकडून किती वेगाने पूर्ण होतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment