भारत-श्रीलंका व्यापार, उद्योगांचा विकास संयुक्तरीत्या करू - रवींद्र माणगावे
*महाराष्ट्र चेंबरतर्फे श्रीलंका दूतावासासोबत चर्चासत्र संपन्न*
मुंबई, राहुल बैसाणे - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (MACCIA) आणि श्रीलंका दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबरच्या मुख्य कार्यालय मुंबईत अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीलंका वाणिज्य दूतावासच्या प्रियांका विक्रमसिंघे यांच्या प्रमुख उपस्थित चर्चासत्र संपन्न झाले.
या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष एस. डी. परब, उपाध्यक्ष शंकर शिंदे, उपाध्यक्ष दिलीप गुप्ता, आंतरराष्ट्रीय व्यापार समितीचे अध्यक्ष गगन महोत्रा, श्रीलंका निर्यात विकास मंडळाच्या सहाय्यक संचालक श्रीमती कुमुदिनी इरुग्गलबंदारा, काऊन्सिल व्यावसायिक श्रीमती शिरानी अरियाराथने, श्रीलंका वाणिज्य दूतावासच्या कॉन्सुलेट जनरल श्रीमती प्रियांका विक्रमसिंघे उपस्थित होते.
सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे यांनी श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावास (Consulate General) Ms. प्रियांगा विक्रमसिंघे यांचा सत्कार केला. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे यांनी महाराष्ट्र चेंबरची माहिती देऊन राज्यातील व्यापार, उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगांच्या विकासासाठी महाराष्ट्र चेंबर करत असलेल्या कार्याची माहिती दिली. भारत व श्रीलंका दोन्ही देशांदरम्यान उत्पादन, सेवा, कृषी, लॉजिस्टिक्स आणि उदयोन्मुख क्षेत्रात संयुक्तरीत्या विविध उपक्रम करून व्यापार, उद्योगांचा विकास करण्यावर भर देण्यात येईल असे सांगितले. श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावासच्या कॉन्सुलेट जनरल श्रीमती प्रियांगा विक्रमसिंघे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचे कौतुक करून अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले. भारतासोबतचे व्यापारी, औद्योगिक व आर्थिक संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नांसाठी उपस्थित उद्योजकांनी मांडलेल्या चिंता आणि सूचनांवर सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित अधिकाऱ्यांसोबत मिळून हे मुद्दे सोडविण्यात येतील असे आश्वासन श्रीमती विक्रमसिंघे यांनी दिले.
या चर्चासत्रात श्रीलंकेतील १४ प्रस्थापित उद्योजकांनी सहभाग घेतला. या प्रतिनिधींनी महाराष्ट्र चेंबरच्या सदस्यांशी थेट संवाद साधून संभाव्य भागीदारी, संयुक्त उपक्रम आणि व्यापार विस्ताराच्या नवीन संधींवर विचारविनिमय केला. दोन्ही प्रदेशांतील उद्योगांना लाभ होईल असे दीर्घकालीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यात या प्रतिनिधींनी विशेष रस दाखवला.संवादात्मक सत्रांमध्ये उत्पादन, सेवा, कृषी, लॉजिस्टिक्स आणि उदयोन्मुख क्षेत्रातील सहकार्याच्या संधींवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चासत्रामुळे सकारात्मक व्यावसायिक वातावरण निर्माण झाले, ज्यातून दोन्ही देशांदरम्यान सहकार्याचे परस्पर फायदे अधोरेखित झाले.व्यावसायिक नेटवर्किंग व्यतिरिक्त, कार्यक्रमात धोरणात्मक स्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. यामध्ये भारत-श्रीलंका मुक्त व्यापार करारातील (India–Sri Lanka Free Trade Agreement) नकारात्मक यादी (negative list), द्विपक्षीय व्यापारातील सध्याची आव्हाने आणि श्रीलंकेतील बँकांनी जारी केलेल्या लेटर ऑफ क्रेडिट (LC) संबंधित चिंता यावर विचारमंथन झाले. महाराष्ट्र चेंबरच्या सदस्यांनी व्यापार, उद्योग सुलभ करण्यासाठी आणि भारतीय निर्यातदारांसाठी आर्थिक विश्वास वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
No comments:
Post a Comment