पूरग्रस्तांच्या मदतीसाठी के. बी. के. इंटरनॅशनल स्कूलचा पुढाकार —
*आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपूर्द*
कल्याण, संदीप शेंडगे – मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरपरिस्थितीत अनेक शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी समाजातील विविध घटक पुढे सरसावले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक विधायक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमानुसार समाजातील विविध घटकातील दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहायता निधी भरघोस मदत करण्याचे नरेंद्र पवार यांनी आवाहन केले होते त्यानुसार एस. बी. खराडे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित के. बी. के. इंटरनॅशनल स्कूल तर्फे संस्थापक अध्यक्ष सुबराव खराडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश सुपूर्द केला. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दिलेला हा आर्थिक हातभार समाजातील जबाबदार नागरिकत्वाचे उदाहरण ठरला आहे. तसेच पूरग्रस्तांसाठी खारीचा वाटा मदत होणार आहे या प्रसंगी आमदार नरेंद्र पवार यांनी या शिक्षण संस्थेचे सामाजिक उत्तरदायित्वाचे कौतुक करताना सांगितले की, “शैक्षणिक संस्था केवळ शिक्षणापुरत्याच मर्यादित न राहता, समाजाच्या संकटकाळात पुढाकार घेतात तेव्हाच खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्व सार्थक होते.” पूरग्रस्तांच्या मदतीसाठी के. बी. के. इंटरनॅशनल स्कूलने दाखविलेली ही सामाजिक संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी सुबराव खराडे यांनी मुख्यमंत्री यांच्या हातात मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
No comments:
Post a Comment