शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!
मुंबई (शांताराम गुडेकर)
बालपणापासून गायन व संगीताची आवड असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या निवे खुर्द येथील शाहीर जयंत राजाराम चव्हाण( उर्फ बापू) यांनी वयाच्या १७ व्या वर्षी गुरुवर्य शिवशाहीर विठोबा साळवी रा. खेड यांच्या मार्गदर्शनाखाली, कोकणातील प्रसिद्ध लोककला जाखडी, नमन या क्षेत्रात पहीले पाऊल ठेवले आणि यशस्वीपणे गेली ४०वर्ष ही कला जोपासत आहेत.कलगीतुरा समन्वय समिती संगमेश्वर देवरुखचे गेली २५ वर्ष ते उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.सामाजिक क्षेत्रात ही बापू अग्रेसर आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत कलगी तुरा लोककला संवर्धनपर अविरत कार्यरत असणारी कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई-(महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या वतीने कलगी तुरा शाहीर पुरस्कार-२०२५ देऊन गौरव करण्यात आला.
कोकणातील लोककला आणि लोककलावंतांसाठी सातत्याने सक्रीय असणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असणारे शाहीर जयंत चव्हाण (बापू)यांना नुकताच भारतरत्न लताताई मंगेशकर नाट्यगृह, मीरारोड (पूर्व) मुंबई येथे संपन्न झालेल्या बहारदार पुरस्कार वितरण सोहळ्यात 'कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५' मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.कलगी तुरा या कोकणच्या लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी गेली ६५ वर्षे कार्यान्वीत असलेली नोंदणीकृत संस्था म्हणजे कलगीतुरा समाज उन्नती मंडळ, मुंबईतर्फे हा गौरव करण्यात आला.
कोकणातील नामवंत शाहिरांचा तसेच आयोजक व काही पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.शाहीर जयंत चव्हाण (बापू) यांचे लोककलेतील योगदान सर्वश्रुत आहे. शाहीर जयंत चव्हाण यांना आजवर अनेक पुरस्कारांनी वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी सन्मानित केले आहे. परंतु सदरचा पुरस्कार कलगी तुरा या लोककलेतील मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या संस्थेने दिलेला पुरस्कार हा आपल्यासाठी विशेष असल्याचे शाहीर जयंत चव्हाण यांनी पत्रकार मंडळीशी बोलताना मत व्यक्त केले. पुरस्कार वितरण प्रसंगी सामाजिक, राजकीय तसेच लोककला क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वाची उपस्थिती लाभली होती.
काही दिवसांपूर्वीच मा.माजी आमदार सुभाषजी बने साहेब यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री महोदय यांनी मंजूरी देत राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समिती (जिल्हा रत्नागिरी) मध्ये शाहीर जयंत राजाराम चव्हाण (उर्फ बापू) यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील सर्व कलेतील कलावंतांना याचा निश्चित पणे फायदा होणार आहे.त्यांची नियुक्ती तसेच कलगी तुरा शाहीर पुरस्कार-२०२५ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातून शाहीर बापू चव्हाण यांच्या वर कलावंताकडून तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन सह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment