देशप्रेमावरील मुशायऱ्याने रंगले सर्व धर्म स्नेह संमेलन !
ठाणे, दि. १,
समतेचा, बंधुत्वाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा अधिकार जनतेला देणाऱ्या संविधानाच्या निर्मितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून व थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुलेंच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त, समता विचार प्रसारक संस्थेचे १५ वे वार्षिक सर्व धर्म स्नेह संमेलन ठाण्यातील मो. ह. विद्यालयात जल्लोषात पार पडले. राबोडी फ्रेंड सर्कल शाळेतील ९ मुलींनी शिक्षिका नूरजहाँ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मजहब नहीं सिखाता आपस मे बैर रखना...’ या थीमवर प्रभावी मुशायरा सादर करत उपस्थितांची मन जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर होते. संस्थेच्या कार्यकर्ता व बुरोंडकर शाळेच्या मुख्याध्यापिका फरहाना शेख यांनी कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालन केले.
मुंब्र्यातील अल नदी उल फलाह शाळेचे मुख्याध्यापक व सेवाधाम संस्थेचे कार्यकर्ते झोएब मुनीब शेख यांनी इस्लाम धर्माच्या शिकवणुकीबद्दल मुलांना माहिती दिली. ते म्हणाले, धर्म आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. द्वेषाने नव्हे तर प्रेमाने आणि विवेकाने धर्माची शिकवण आचरणात आणली तर आपलं आयुष्य फुलासारखं फुलून येतं, समाधानी बनतं. संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी बौद्ध धर्माबद्दल माहिती सांगताना गौतम बुद्धाच्या आयुष्यातील प्रसंग वर्णन केले. त्या म्हणाल्या, शांतता, समता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाने, लढाईने नव्हे तर चर्चेने, सामोपचाराने समस्या सोडविण्याची शिकवण दिली. उपास तापास न करता मनावर ताबा ठेवावा, राग, द्वेष अशा नकारात्मक भावनांना आवर घालावा, ध्यान धारणा करत मन:शांति मिळवावी. खरं ज्ञान हे आत्मचिंतनातूनच मिळतं. हीच बौद्ध धम्माची शिकवण आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच साठी बौद्ध धम्माला पुनर्जीवित केले. प्रास्ताविकात संयोजक मनिषा जोशी यांनी सध्यस्थितीत धर्म जातीच्या आधारावर द्वेष पसरवला जात असतांना अशा संमेलनातून संस्था संविधानातील समता, लोकशाही व धर्मनिरपेक्षतेची मूल्ये रुजवण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.
सर्व धर्मातील कंत्राटी कामगारांची परवड
ठाण्यातील कंत्राटी कामगार महिलांशी संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर यांनी संवाद साधून त्यांचे अनुभव, त्यांच्या समस्या लोकांसमोर आणल्या. ठाण्याच्या मानसिक रुग्णालयात काम करणाऱ्या अनिता कुंभावत आणि ठाणे महानगर पालिकेच्या शाळेत सफाई काम करणाऱ्या साबेरा बशीर सौदागर यांनी काम करताना येणारे हलाखीचे अनुभव विशद केले. कंत्राटदार पगार देताना पिळवणूक करतात याबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, किमान वेतन मिळत नाही. अनेकदा वेळेवर पगार मिळत नाही. ग्रॅच्युइटी, फंड, आरोग्य सुविधा देत नाहीत. वर समाजही सफाई कामगार म्हणून तुच्छतेने वागवतो. अनिता कुंभावत यांनी मेंटल हॉस्पिटल कामगारांना कराव्या लागलेल्या बेमुदत उपोषणाची हृदयद्रावक कहाणी सादर केली तेंव्हा सर्वजण हेलावून गेले. सफाई व अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची अशी परवड होत असतांनाही नियमित काम करतात म्हणून शहराचे आरोग्य शाबूत रहाते, अशा शब्दात या कामगारांच्या कतृत्वाचा मीनल उत्तुरकरांनी गौरव केला. कळवा येथील भीम नगर वस्तीतील मुलींची ‘कारी कारी...’ या गीतावर छान समूह नृत्य सादर केलं. ‘मीडिया भारत न्यूज़’ या वेब पत्रिकेचे संपादक व कायद्याने वागा लोकचळवळीचे राज असरोंडकर आणि समाधान पवार यांनी हिंदी चित्रपटातील समतेच्या मूल्यांवर आधारित फिल्मी गीते सादर करून मजा आणली.
स्पर्धांमधील सहभागी व विजेत्यांना बक्षिसे
संस्थेतर्फे घेतलेल्या हिरजी गोहिल क्रीडा जल्लोषातील क्रिकेट, कबड्डी, कॅरम, बुद्धिबळ आणि चित्रकला या खेळातील सहभागी खेळाडूंना व विजेत्यांना पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कबड्डी विजेता जय भीम नगर, तर उपविजेता किसन नगर ठरले. क्रिकेट विजेते कळवा – मुंब्रा संघ तर उपविजेते कळवा येथील म. फुले नगर होते. उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज म्हणून जय कोळी व जल्पेश यादव यांना गौरवण्यात आले. मुलींच्या कबड्डीत अण्णाभाऊ साठे नगर व मानपाडा या संघांना पुरस्कार मिळाला. चित्रकलेत प्रथम पारितोषिक शैझीन शोएब शेखला मिळाले तर दुसरे व तिसरे बक्षीस इशरत शेख व आफिया शेख यांनी पटकावले. कॅरम मध्ये प्रज्ञेश मडके व नानक बेदी तर बुद्धिबळात जोगिंदर बेदी व मेघा कांबळी विजेते व उपविजेते ठरले. राबोडी फ्रेंड्स सर्कलचे विश्वस्त सैद सर, चळवळीतील कार्यकर्ते अविनाश कदम व संस्थेच्या सचीव लतिका सु. मो. आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक डॉ. संजय मंगला गोपाळ, भारत जोडो अभियान चे सुब्रतो भट्टाचार्य, वृषाली कुलकर्णी,अनेक पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक जगदीश खैरालिया यांचे महत्त्वाचे योगदान होते. एकलव्य कार्यकर्ते अजय भोसले, ऋतुराज परह्यार, किशन बेदी, राबोडी फ्रेंड सर्कल शाळेतील शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली.
मीनल उत्तुरकर
विश्वस्त, समता विचार प्रसारक संस्था
9833113414
No comments:
Post a Comment