'व्हाईस ऑफ मिडिया’चा कोकण मुंबई अध्यक्ष, पत्रकार अरुण ठोंबरे व भुजंगराव सोनकांबळे यांना अटक !!
कापूरबावडी पोलिस स्टेशन, ठाणे यांची कारवाई
ठाणे : कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात ‘व्हाईस ऑफ मिडिया’ या पत्रकार संघटनेचे कोकण-मुंबई अध्यक्ष अरुण सदाशिव ठोंबरे तसेच भुजंगराव नागराव सोनकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ०४ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली असून, आरोपींच्या नातेवाईक व मित्रांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ४८ अंतर्गत अधिकृत सूचना बजावण्यात आल्या आहेत.
कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ८६४/२०२५ अंतर्गत आरोपींविरोधात बीएनएस २०२३ चे कलम ३०८(५), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिला आरोपी अरुण सदाशिव ठोंबरे (वय ५८, रा. चिखोली, अंबरनाथ पश्चिम) हा ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचा कोकण-मुंबई विभागाचा अध्यक्ष असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेची माहिती देण्यासाठी त्याचा मित्र सुरेश बजरंग जगताप (वय ५२, व्यवसाय – पत्रकार, रा. उल्हासनगर) यांना अधिकृत सूचना बजावण्यात आली आहे. ठोंबरे यांना पुढील कारवाईसाठी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, न्यायालय क्रमांक २, ठाणे येथे हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या वतीने वकील नेमून जामीन प्रक्रियेसाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी भुजंगराव नागराव सोनकांबळे (वय ३७, रा. वर्तकनगर, ठाणे पश्चिम) यालाही अटक करण्यात आली असून, त्याची बहीण उषा मनोज जाधव (वय ३५, रा. मनोरमा नगर, ठाणे पश्चिम) यांना देखील अधिकृत सूचना देण्यात आली आहे. त्यालाही लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असून, जामीन प्रक्रियेसाठी वकील नेमण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, आरोपी अरुण ठोंबरे यांच्याविरोधात यापूर्वीही म.फु.चौ. पोलीस ठाणे, कल्याण येथे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी गुन्हा क्रमांक ११६१/२०२४ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ३५६(१), ३५६(२), ३५६(३) तसेच ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्यांचा सहकारी मित्र सुरेश जगताप हाही आरोपी आहे.
ही संपूर्ण कारवाई कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास सुरू आहे. या अटक कारवाईमुळे ठाणे शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment