धक्कादायक घटना - ठाण्यात काळ्या जादूची भीती दाखवून केली फसवणूक !!
ठाणे, ता. ४ : काळी जादू, पूजा विधी आणि १२ ज्योतिर्लिंग यात्रेचे प्रलोभन दाखवून ठाण्यातील उच्चभ्रू गृहसंकुलामधील एका कुटुंबाची एक कोटी ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार फेब्रुवारी २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत घडला असून याप्रकरणी मंजुनाथ शेट्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २५ वर्षीय तरुणी ही हिरानंदानी इस्टेट येथे राहणारी आहे. त्या तरुणीने दिलेल्या तक्रारीत, मंजुनाथ शेट्टीने सामाजिक ओळखीचा फायदा घेत तक्रारदार कुटुंबाचा विश्वास संपादन केला. कुटुंबावर नातेवाइकांनी काळी जादू केल्याचा खोटा दावा करत 'तुमच्या जीवाला धोका आहे' अशी भीती निर्माण केली. यावर उपाय म्हणून केरळमधील पुजाऱ्यांमार्फत विविध पूजा व १२ ज्योतिर्लिंग यात्रा करण्याचा सल्ला देण्यात आला. फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान त्याने सुरुवातीला १० लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर वेळोवेळी नवीन कारणे देत आणि भीती दाखवत त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. न्यायालयीन प्रकरणे, अपूर्ण पूजा विधी आणि भविष्यातील संकटांची भीती दाखवत मे २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत विविध बँक खात्यांवर १.५६ कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले. अशाप्रकारे एकूण रक्कम १.६६ कोटींवर पोहोचल्यानंतरही त्याने पैसे मागणे सुरूच ठेवले. त्यामुळे संशय बळावल्याने कुटुंबाला फसवणुकीची जाणीव झाली. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment