सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेतून शेतकरी महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा !!
*उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान व पंचायत समिती कल्याण कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण तालुक्यातील महिला बचत गटांनी ई-कार्टच्या माध्यमातून थेट बाजारपेठ गाठली*
ठाणे, दि. २० : पंचायत समिती कल्याण कृषी विभाग व उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या कृती संगमातून सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजना २०२५-२६ अंतर्गत ६० टक्के अनुदानित योजनेद्वारे कल्याण तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत घोटसई प्रभागातील सांगोडे गावच्या “स्वराज्य स्वयं सहायता समूह” आणि वासुंद्री गावच्या “प्रगती स्वयं सहायता समूह” या महिला बचत गटांनी ई-कार्टचा लाभ घेत स्वतःचा भाजीपाला थेट बाजारपेठेत विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागातील अनेक महिला शेतकरी भाजीपाला उत्पादन करत असल्या तरी बाजारपेठेचे ज्ञान, वाहतुकीची सुविधा आणि विक्री व्यवस्थेअभावी त्यांना आपला माल कमी दरात व्यापाऱ्यांना विकावा लागत होता. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या भाजीपाल्याला योग्य मोबदला मिळत नसल्याने महिलांच्या उत्पन्नावर मर्यादा येत होत्या.
ही परिस्थिती बदलण्यासाठी महिला बचत गटांनी एकत्र येत गावातील महिलांचा भाजीपाला संकलित करून तो थेट मोठ्या बाजारपेठेत विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पंचायत समिती कल्याण कृषी विभागामार्फत सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजना अंतर्गत ई-कार्ट उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेत ६० टक्के अनुदान मिळाल्यामुळे महिलांनी स्वनिधीतून उर्वरित रक्कम उभी करून हा उपक्रम सुरू केला आहे.
या माध्यमातून सांगोडे व वासुंद्री गावातील महिला आता कल्याण, टिटवाळा तसेच विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट भाजीपाला विक्री करत आहेत. त्यामुळे मध्यस्थांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली असून शेतमालाला पूर्वीपेक्षा अधिक चांगला दर मिळू लागला आहे.
भाजीपाला विक्रीबरोबरच या ई-कार्टचा उपयोग गावातील मच्छी विक्री, पाणी जार वाहतूक तसेच इतर वस्तूंच्या ने-आणीसाठीही करण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील महिलांना कमी खर्चात वाहतूक सुविधा उपलब्ध होऊन अतिरिक्त रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.
स्वराज्य स्वयं सहायता समूहाच्या सदस्य कामिनी शनिश्वर सुतार यांनी सांगितले की, “उमेद अभियानामुळे आम्हाला उपजीविका वाढीचे महत्त्व समजले. आधुनिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळल्यानंतर उत्पादन वाढले, मात्र बाजारपेठेअभावी योग्य दर मिळत नव्हता. आता ई-कार्टमुळे आम्ही स्वतःच भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे आम्हाला चांगला भाव मिळत असून गावातील इतर महिलांनाही फायदा होत आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, “पूर्वी व्यापाऱ्यांना कमी दरात भाजी विकावी लागत होती. आता आम्ही गावातील महिलांकडूनच भाजीपाला योग्य दराने खरेदी करून मोठ्या बाजारात विक्री करत आहोत. यातून गटातील महिलांचे उत्पन्न वाढत असून आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे.”
जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती कल्याण यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यात येत असून ग्रामीण महिलांना रोजगार, बाजारपेठ आणि आर्थिक सक्षमीकरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिला शेतकरी संघटित होत असून “उत्पादन ते बाजारपेठ” हा संपूर्ण प्रवास स्वतः हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण होत आहे. सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासाबरोबरच ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराला नवी गती मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आणि पुढे जाऊन अशाच प्रकारे उमेद - महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मार्फत महिलांच्या उपजीविका वाढीवर भर देऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रॉडक्ट्स तयार करणार आहेत.
जसे आता भाजीपाला कलेक्शन, ग्रेडिंग, पॅकिंजिंग, बाजारपेठ शोधणे, मार्केटिंग करून स्वतः मार्केट मध्ये स्थान निर्माण करत आहेत.
No comments:
Post a Comment