पालिकेच्या प्रत्येक प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावी आयुक्तांचे आदेश !!
कल्याण, संदीप शेंडगे : पालिकेच्या प्रत्येक प्राधिकरणाने आपापल्या अखत्यारीतील अत्यावश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज त्यांच्या दालनात संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थित अधिकारी वर्गास दिले.
या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोर्डे, इतर आस्थापना तसेच एमआयडीसी, पोलीस, अग्निशमन, बांधकाम विभाग, मेट्रो, वाहतूक व्यवस्था इ. विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका तसेच इतर शासकीय यंत्रणांनी समन्वयाने आणि प्राधान्य देऊन रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. पावसाळी परिस्थितीत, दुर्घटना टाळण्यासाठी, अतिधोकादायक इमारतींमधून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी पोलीस प्रशासनाने महापालिकेस सहकार्य करावे, यासाठी अतिधोकादायक इमारतींची यादी पोलीस प्रशासनाला पाठवण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी या बैठकीत दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त केलेल्या यंत्रणांनी त्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करावा. सदर कॅमेरे संबंधित यंत्रणांनी दुरुस्त करून घ्यावेत अथवा त्यांचा खर्च महापालिकेस अदा करावा, असेही निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले.
महापालिका मुख्यालयात तसेच प्रत्येक प्रभाग स्तरावर आपली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक प्राधिकरणाने आपल्या नोडल अधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांस द्यावा, म्हणजे पावसाळी परिस्थितीत नागरिकांना प्रतिसाद देणे सुलभ होईल, असेही ते पुढे म्हणाले.
महावितरणाने कापलेल्या झाडांच्या फांद्या त्यांच्या मार्फत उचलल्या जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे, सदर फांद्या महापालिकेमार्फत उचलल्या जात आहेत. सदरचा खर्च महावितरणाने महापालिकेस अदा करावा, असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत महापालिका मुख्यालयातील १००२३३००५४, ०२५१२३२७२७३, ०२५१२३२६६५५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment