कोकणातील ज्येष्ठ लोकशाहीर मोरेश्वर म्हात्रे यांचे निधन !!
उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
उरण पूर्व विभागातील खोपटे (धसाखोशी) गावातील ज्येष्ठ लोकशाहीर मोरेश्वर सिताराम म्हात्रे (वय ८८) यांचे शुक्रवार दिनांक १६ मे २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने उरण परिसरासह संपूर्ण कोकणातील लोककला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
कै. मोरेश्वर म्हात्रे यांनी १९७० च्या दशकात आपल्या दमदार लोकगीत गायनातून संपूर्ण कोकणपट्टा अक्षरशः पिंजून काढला होता. पारंपरिक लोककला, कोकणी संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या गीतांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असे. त्यांच्या आवाजाची आणि सादरीकरणाची खास शैली लोकांच्या मनात आजही कायम आहे.
ते थोर कवीगायक तथा “रेडिओ स्टार” म्हणून प्रसिद्ध असलेले कै. काशिनाथ म्हात्रे यांचे शिष्य होते. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकसंगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या पश्चात चार विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या असा परिवार आहे. विशेष म्हणजे, त्यांनी जोपासलेली लोकगीतांची परंपरा त्यांचे दोन पुत्र आजही अविरतपणे पुढे चालवित आहेत.
कै. मोरेश्वर म्हात्रे यांच्या अंत्यविधीसाठी उरण पूर्व पंचकोशीतील शेकडो नागरिक, लोककलावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
No comments:
Post a Comment