Thursday, 4 October 2018

कंडोमनपा च्या 'जे' प्रभाग कार्यालयावर मोर्चा

कल्याण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा ‘जे’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा

कल्याण- (इम्तियाज खान)
                 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे, उपाध्यक्ष जयपाल कांबळे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा प्रभाग कार्यालयावर धडकला. कोणतेही स्थगिती आदेश नसतानाही महापालिका सदर बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वकिलांचा अभिप्राय आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन यावेळी दिले.
       कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी खुलेआम अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. अशाच कल्याण पूर्वेतील वालधुनी भागातील शिवाजीनगर येथे इक्बाल अहमद अब्दुल हकीम शेख यांची अडीच गुंठे जागा आहे. सदर जागेवर एका इसमाने अनधिकृतपणे पत्र्याचे शेड बांधले. सदर शेडवर पाठपुरावा करूनही कारवाई होत नव्हती. सदर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने पुढे दि. २२ फेब्रुवारी २०१७ रोजी स्टे उठवून जागा मालक शेख यांच्या बाजूने निकाल दिला. तरी महापालिकेकडून सदर बांधकामावर कारवाई होत नसल्याने आज सिद्धार्थनगर येथील बुद्धविहार येथून ‘जे’ प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
      यावेळी  बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप प्रभाग क्षेत्र अधिकारी व महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांची भेट घेतली असता त्यांनी महापालिकेच्या वकिलाकडून सदर बांधकामाबाबत लेखी अहवाल आल्यानंतर लगेच पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. ठाणे जिल्हा सचिव उषा गमरे, उपाध्यक्ष राहुल मगरे, अजय शाम मौर्य,  सुरेश पॉल,  निसार शेख, आदित्य चिकटे यांच्यासह ज्युबिली पार्क येथील रहिवाशी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
       यावेळी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुदतीत सदर बांधकामावर कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन महापालिकेच्या मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे नेते नरसिंग गायसमुद्रे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन !!

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन !! उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्या...