रोजगाराअभावी आदिवासी गरोदर महिला व मुलांचे कुपोषण !!
"गर्भातील बाळं जन्माला येण्याआधीच दगावण्याचा धोका"
====================
मुरबाड{ मंगल डोंगरे } - कोरोना व्हायरसमुळे रोजगारा पासुन वंचित असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील गरोदर महिलां व बालकांच्या कुपोषणाचा फार मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. विटभट्टीवर रोजगारासाठी गेलेली आदिवासी कातकरी कुटुंबे लॉकडाऊन मुळें गावाकडे परत आली. परंतु रोजगार उपलब्ध नसल्याने जवळपास तीन महिने घरातच थांबुन राहणे भाग पडल्याने अनेक महिला व मुलांना कुपोषणाची समस्या निर्माण झाली. यातील काही आदिवासी गरोदर महिला कुपोषित झाल्याने त्यांच्या गर्भातील बाळांनासुध्दा धोका निर्माण झाला असल्याने काही महिलांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोणा व्हायरसमुळे सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने विटभट्टीवरील व इतर ठिकाणी मोलमजुरी करणारी आदिवासी कुटुंबे आपापल्या गाव,वाड्या, पाड्यांमध्ये परत आली.परंतु लॉकडाऊनमुळे कुठेही कामधंदा नसल्याने व जवळ पुरेसा पैसा नसल्याने कुपोषण होऊ लागले. अनेक सामाजिक व राजकीय संस्थांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले .परंतु ही मदत काही दिवसच पुरेल इतकीच असल्याने व तिही संपुष्टात आल्याने पोटाची भूक भागविण्यासाठी जंगलातील कंदमुळे खाणे भाग पडत आहे. परिणामी कोरोनापेक्षा कुपोषणाचा महाभयानक प्रश्न या आदिवासी कुटुंबांना निर्माण झाला आहे. खेदजनक बाब म्हणजे मुरबाड तालुक्यातील सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासी कातकरी समाजातील दोन गरोदर महिला तपासणी साठी गेल्या असता आरोग्य अधिकारी डॉ. नम्रता कुलकर्णी यांच्या निदर्शनास आले की या महिलां कुपोषित आहेत. म्हणुन त्यांनी त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता ,सुनिता वाघ,6.6 तर संगीता हिलम 5.8 हिमोग्लोबिन असल्याचे दिसून आले. या गरोदर महिलांच्या बरोबर गर्भातील बाळाला सुध्दा धोका आहे हे ओळखून डॉ. कुलकर्णी यांनी तातडीने उल्हासनगर नगर येथील मध्यवर्ती रूग्णालयात रक्ताची पुर्तता करण्यासाठी स्वतःच्या वाहनाने पाठवून दाखल केले आहे. अशा हजारो आदिवासी कातकरी समाजातील गरोदर महिलांना योग्य आहार मिळत नसल्याने कुपोषणाची समस्या निर्माण होऊन गरोदर महिलांच्या गर्भातील अंकुर जन्माला येण्या आधी गर्भातच दगावण्याची शक्यता निर्माण होत आहे. आरोग्य विभागानेही कोरोणा रूग्णांबरोबरच आदिवासी गरोदर महिलांच्या या गंभीर प्रश्नी योग्य प्रकारे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या आदिवासी बांधवांना शासनाने तात्काळ रोजगार उपलब्ध करुन देणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
" आदिवासी बांधवांच्या सध्याच्या या परिस्थितीत शासनाने तात्काळ खावटी योजना सुरू करून रेशनिंग धान्य उपलब्ध करून द्यावे."--. सतिषचंद्र घरत
शिवसेना उपतालुकाप्रमुख,मुरबाड
No comments:
Post a Comment