Wednesday, 12 August 2020

मुरबाडमधील 250 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप !!

मुरबाडमधील 250 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप !!


  मुरबाड{ मंगल डोंगरे }  कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या जिल्ह्यातील दुर्गम वाड्या- पाड्यांवर राहणाऱ्या कातकरी कुटुंबाच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कातकरी कुटुंबांच्या अन्न सुरक्षेसाठी यंदा अंबरनाथमधील सामाजिक संस्था पुढे आल्या असून त्यांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील 250आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. पावसाळा हा या कातकरी कुटुंबांसाठी आव्हानात्मक असतो. यंदा कोरोनामुळे इतर रोजगारही बंद असल्याने कातकरी कुटुंबांचे सध्या हाल सुरू आहेत. त्यामुळे ही मदत त्यांच्यासाठी दिलासा देऊन गेली.
एरवी मिळेल ते काम करून गुजराण करणाऱ्या कातकरी कुटुंबियांसाठी कोरोनाच्या निमित्ताने जगण्यासाठी नवे आव्हान उभे झाले आहे. पावसाळा हा अशा कुटुंबांसाठी आधीच त्रासदायक असतो. त्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मजुरी बंद असल्याने या कातकरी कुटुंबांची अवस्था वाईट आहे. मुरबाड तालुक्यातील अशा कातकरी कुटुंबाचा शोध *प्राणिक आरोग्यम फाऊंडेशनच्या *स्थानिक कार्यकर्त्यांनी सुरू केला होता. मुरबाडमधील आंबिवली, चासोळे, दादरा, मोरोशी, वाघाची वाडी, उंबरवाडी, तळ्याची वाई, जडई, खडकपाडा, झाडघर, मोहाची वाडी या गावातील गरजू  कुटुंबांना काही महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा निर्णय अंबरनाथमधील स्पंदन फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि इनरव्हिल क्लबच्या वतीने घेण्यात आला. यातील पहिल्या टप्प्यात 250 कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक किराणा वस्तूंचे वाटप रविवारपासून सुरू करण्यात आले आहे. यावेळी स्पंदन फाऊंडेशनचे डॉ राहूल चौधरी, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे नितिन मोरे आणि इनरव्हिल क्लबच्या अंजली वारके उपस्थित होत्या. कातकरी कुटुंबाच्या थेट धरी जाऊन ही मदत देण्यात आली. यावेळी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आणि त्यापासून घ्यावयाची काळजी याबाबत स्पंदन फाऊंडेशनच्या डॉ राहूल चौधरी यांनी कातकरी कुटुंबांना मार्गदर्शन केले. यावेळी याबाबतचे असलेले गैरसमजही दूर करण्यात आले. ऐन पावसाळ्यात मिळालेल्या या मदतीमुळे कातकरी कुटुंबामध्ये दिलासादायक वातावरण होते.    

No comments:

Post a Comment

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!! उरण दि २, (विठ्ठल...