कल्याण तहसील कार्यालयात कोरोनाचा धुमधडाक्यात प्रवेश, काही दिवस कार्यालय बंद?
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्याचे महसूल केंद्र म्हणून ओळखले जाणारे कल्याण तहसील कार्यालयात कोरोनाचा अगदी धूमधडाक्यात प्रवेश झाला असून तब्बल ८ कर्मचाऱ्यांना कोरोनोचा लागण झाल्याने हे कार्यालय पुढील काही दिवस बंद रहाणार की नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुरु ठेवणार हे उद्या म्हणजे सोमवारी कळणारे आहे.
कल्याण पंचायत समितीच्या बाजूला आणि कल्याण रेल्वे स्टेशन पासुन अगदी हाकेच्या अंतरावर कल्याण तहसीलदार कार्यालय आहे त्यामुळे येथे सदैव नागरिकांची गर्दी असते. परंतु कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील गर्दी काहीशी कमी झाली आहे. परंतू कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या ना त्या कारणाने लोकांशी सतत संपर्क येत असतोच.
कल्याण तहसील कार्यालय हे ब्रिटिश कालीन आहे. या कार्यालया अंतर्गत सहा मंडल अधिकारी येत असून यामध्ये अप्पर कल्याण, कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा, नडगाव, आणि नव्यानेच अस्तित्वात येणारे म्हारळ यांचा समावेश आहे. तलाठी व मंडल आधिकारी असे ३५ कर्मचारी असून तहसील कार्यालयात ४० कर्मचारी आहेत. हे संजय गांधी, बिनशेती, अभिलेख, टपाल, निवासी नायब तहसीलदार, पुरवठा, सेतू आपत्ती निवारण कक्ष, आणि तहसीलदार आदी विभागात काम करतात. यातील तब्बल ८ कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाली असून ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
तालुक्यातून महसूल जमा करण्याचे अंत्यत महत्त्वाचे काम हे कार्यालय करते. शिवाय जागा जमिनीच्या नोंदी, कुळकायदा केसेस, वारस नोंदी, आदी विविध प्रकारच्या प्रकरणात तालुका मॅजेस्टिक म्हणून तहसीलदार काम करतात. त्यामुळे वादी प्रतिवादी असे अनेक शेकडो लोक या कार्यालयात येत असतात. शिवाय आपत्ती व्यवस्थापन मध्ये हे कार्यालय खूपच महत्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे याचा सतत लोकांशी संपर्क येतो म्हणून कोरोनोचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस कल्याण तहसीलदार कार्यालय बंद राहील असे कळते. परंतू सेतू सुविधा सुरुच राहिल असे सांगून तहसीलदार कार्यालय देखील लोकांची गैरसोय होत असेल तर बंद ठेवणार नाही असे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment