Tuesday 25 August 2020

महाड तारिक गार्डन इमारतीच्या बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल तर दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : 'पालकमंत्री कु.अादिती तटकरे'

महाड तारिक गार्डन इमारतीच्या बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल तर  दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : 'पालकमंत्री कु.अादिती तटकरे'
      
       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही ५ मजली इमारत सोमवार,दिनांक २४ ऑगस्ट राेजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या पार्श्वभूमीवर या इमारतीचा बिल्डर तसेच अन्य संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.
     महाड शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत  कोसळल्यानंतर रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.
       यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी  डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
        या दूर्घटनेत बारा व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सदर इमारत  पाच मजली असून तिला ए आणि बी अशा दोन विंग होत्या. सदर इमारतीचे बांधकाम सात ते आठ वर्षांपुर्वी झाले होते. इमारतीच्या दोन्ही विंग मधील काही सतर्क लोकांना सदर इमारतीच्या दुर्घटनेची चाहूल लागताच ते तात्काळ इमारतीच्या बाहेर पडले. 
      सदर इमारतीच्या  दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल  करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधून दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्याचप्रमाणे जखमींना योग्य ती शासकीय मदत देण्यात येईल, यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केल्याचे तसेच दुर्घटनाग्रस्तांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही काही लोक ढिगार्याखाली अडकले असल्याची शक्यता त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून बचाव पथके आणि तीन एनडीआरएफ ची बचाव पथके श्वानपथकाच्या मदतीने युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य करीत असल्याची  माहितीही त्यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...