बाप्पा बोलला माझ्याशी !! 'डॉक्टर सुनिता चव्हाण'
मुंबई, विष्णु गुप्ता : मुंबईतील बोरिवली येथे रहाणाऱ्या डॉक्टर सुनिता चव्हाण ह्या हळूवार मनाचे व्यक्तिमत्व असून त्यांनी आपल्या वैद्यकीय प्रॅक्टिस सोबत आपले कविमन जिवंत ठेवले. त्यांचा "हळवे पाषाण" हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला असून त्यांच्या सर्वांच्या मदतीला उभे रहाण्याचा स्वभाव हळूवार मनामुळे कोणालाही न दुख:विण्याचा स्वभाव अशा डॉक्टर सुनिता चव्हाण यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्या भावी पिढीला आदर्श आहेत.
डॉक्टर सुनिता चव्हाण यांच्या देवघरातील गणेश ...
डॉक्टर सुनिता चव्हाण यांच्या मनात गणेश चतुर्थीला घरातील गणेशाची आराधना करताना उमटलेले भाव 'मनोगत' :
"बाप्पा बोलला माझ्याशी"
बाप्पाला नमस्कार करुन मागे वळत होतेच तर बाप्पा मला बोलताना दिसला..."अरे बाप्पा,आज चक्क तू बोलतो आहेस"
"अग,मी आज खुप खुश आहे..तुम्ही आज माझी साधी,स्वच्छ आणि सोज्वळ रूपात स्थापना केली आहे..या साधेपणातच खुप भक्तिभाव दिसतोय त्यामुळे मी खूप खुश आहे."
बाप्पा इतक्या समाधानाने बोलत होता कि माझं मन भरुन आलं.मी त्याच्या चरणाजवळ बसत बोलले,"बाप्पा, मंगलमूर्ती,गणेशा,गजानन विघ्नहर्ता खूप नाव आहेत तुला तरी पण आम्ही जेव्हा बाप्पा म्हणतो ना तेव्हा आपल्या पालनकर्त्याला मनापासून साद देतो अशी भावना निर्माण होते,अंतःकरण सुखावते आणि आपोआपच तुझ्यात आणि आमच्यात एक सहजतेचा बंध बनतो आणि तू आमचा होतोस.देवाधिदेवांमध्ये तू खुप जवळचा,अगदी निकटचा वाटतोस कारण तू आमच्या घरी येऊन आमच्यातील एक होऊन राहतोस.. कोणाच्या झोपडीत,कुणाच्या घरी तर कोणाच्या बंगल्यात."
"म्हणून तर मी दरवर्षी तुमच्याकडे येतो तुमचं प्रेम,तुमची भक्ती मला इकडे ओढून आणते."
"तू जेव्हा घरी येतोस ना बाप्पा तेव्हा असं वाटतं की मी माझं सर्व सुख,दुःख,आनंद,चिंता सांगत असताना तू एका वडीलधार्या माणसाप्रमाणे किंवा एका जिवलग मित्राप्रमाणे तू मनःपूर्वक ऐकून घेतो आहेस आणि तुझ्या अस्तित्वाच्या गंधाने तू आम्हाला धीर देतो आहेस मग आमच्या दुःखाला तुझ्या प्रसन्नतेची फुंकर मिळते आणि सारं घर चैतन्यशील होऊन जातं.जे काही आणि जसं काही मिळेल तसे आम्ही तुझी सेवा करतो.तू कधीही कोणत्या गोष्टीचा हट्ट नाही करत आम्ही जे देतो ते तू आनंदाने स्वीकारतोस"
"हो पण या वेळेस मी खूप समाधानी आहे.कुठे गोंगाट नाही,गर्दी नाही,तुम्हा सर्वांची चिंता,आनंद सर्व ऐकून घेण्यास खूप शांत वेळ मिळाला त्यामुळे तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि समजल्या पण. दिखाव्याच्या आणि आवाजाच्या गर्दीत तो भक्तिभाव कुठेतरी हरवून गेला होता असं वाटत होतं.पण आता पाहिलंस ना..मला सोन्या रुप्याची,अलंकारांची गरज नाही,मी शाडूच्या मुर्तीत,लालभडक जास्वंदी मध्ये किती रुबाबदार वाटतो,दुर्वा आणि आघाड्याच्या हिरवा रंगात खुलून दिसतो.मला आवडणारे मोदक, लाडू,खीर हे बाकीच्या प्रसादापेक्षा किती चविष्ट वाटतात.मलाही साधेपणा आवडतो.आज कित्येक घरांमध्ये मुलांनी,मोठ्या माणसांनी, बायकांनी स्वतःच्या हाताने शाडूचे गणपती बनवून त्याची पूजा केली आहे.मी कलेचा दाता आहे त्यामुळे खूप आनंदी आणि समाधानी आहे."
माझं मन पण समाधान पावलं.गणेशाचं मन ख-या अर्थाने आज मनाला भिडलं.."तू येतोस,तू राहतोस पण तुला नक्की काय हवं असतं ते आज समजलं..तू आम्हाला नेहमीच तुझ्या घरी जाण्यापूर्वी आमच्यातील नकारात्मतेला दूर करून सकारात्मकतेची बीज रुजवून जातोस,आशेची पालवी देऊन जातोस..या दोन्हीमुळे आमच्यात आत्मविश्वासाची हिरवळ निर्माण होते त्यामुळे कोणत्याही कार्याला मेहनत आणि श्रध्देच्या जोरावर यशरुपी फुले आणि फळांची चव चाखण्यास आम्ही प्रयत्नशील राहतो..तुझ्या उदारतेचे आम्ही नेहमी कृतज्ञ आहोत..तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव आहे आणि अशीच राहु दे बाप्पा"🙏🏻
"अरे माझी कृपादृष्टी नेहमीच तुमच्यावर असते पण तुम्ही...तुम्ही या दिखाव्याच्या,आवाजाच्या आणि स्पर्धेच्या इतके आहारी गेला होतात की तुम्हाला बाकी दुसरं काही सुचतच नव्हतं..भक्तिभाव कुठेतरी हरवून गेला होता असं जाणवत होतं..आता हा कोरोना आला आहे,त्याने तुम्हाला ख-या जीवनाची दिशा दाखवली आहे... तो जसा आला तसा जाणारही आहे...पण या वेळेत जे तुम्ही शिकलात ते विसरून जाऊ नका..पुन्हा त्याची पुनरावृत्ती करु नका...अगदी अंतकरणापासून जागे व्हा..आज घराघरांमध्ये आपल्या परिवारासोबत राहताना मलाही आनंद झाला. तुम्ही माझी प्रत्येक मंडळांमध्ये किती विभागणी करता..लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्रित करण्यासाठी माझी स्थापना केली पण त्या ध्येयाला आज आकर्षण आणि प्रसिद्धीच्या चकाकीने कुठवर नेऊन ठेवले आहे..मंडळात माझी उंची आणि व्याप्ती वाढऊ नका..तुमच्या कर्तृत्वाची उंची वाढवा आणि सामाजिक बांधिलकी दाखवून तिथे कार्यरत राहून मंडळाचा विकास करा.. हाच गणेश उत्सवाचा खरा अर्थ आहे. तुम्हाला जाणीव आहे..तुम्ही नक्कीच हे करू शकाल..त्याकडे लक्ष द्या"
"हो बाप्पा,या कोरोनामुळे बऱ्याच गोष्टींची,चुकांची जाणीव झाली आहे आम्हाला.आम्ही आता त्याची पुनरावृत्ती नाही करणार.माफ कर आम्हाला.🙏🏻
"आता माझे विसर्जन कराल ते घरातील पाण्यात..एखाद्या कुंडीत.. किंवा बनवलेल्या छोट्या तलावात करा मग मी इथेच विरघळून तुमच्या आसपास नेहमीच राहीन..तुमचे रक्षण करायला..प्रेरणा द्यायला..धीर द्यायला..आनंदात सहभागी व्हायला."
"हो बाप्पा..नक्कीच"असे म्हणून मी नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि पहाते तर बाप्पा पुन्हा आहे तसा आसनस्थ होता.
पण आज मला गणेश चतुर्थीचे खरे महात्म्य समजले होते आणि त्याचा श्री गणेशा आपण प्रत्येकाने करायला हवा...हा संकल्प मी केला आणि तुम्ही?
🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻🌺🙏🏻
©️®️ डाॅ.सुनिता चव्हाण,मुंबई.
I always say, you would be the best writer, keep writing and be an ideal for others, god bless you.
ReplyDelete