सम्राट अशोकाचे सच्चे पाईक महान धम्म प्रचारक अशोक शिलवंत यांचे हृदयविकाराने निधन !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : संपूर्ण भारतभर धम्म प्रचार कार्यासाठी लाखो रुपये खर्च करून स्वखर्चाने भव्य दिव्य अशोक स्तंभांची उभारणी करणारे सम्राट अशोकाचे सच्चे पाईक, अनुपालक, दानशूर व्यक्तीमत्व, रंजल्या गांजल्या गोरगरिबांचे आधारस्तंभ, पुणे पिंपरी चिंचवड येथील अशोक नागरी सहकारी बँक चे संस्थापक धम्म प्रिय अशोक शिलवंत यांचे शुक्रवार दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी पुणे पिंपरी चिंचवड येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आणि दोन मुले असा परिवार आहे.
अशोक शिलवंत हे एक अत्यंत नेक प्रामाणिक आणि कर्तव्य तत्पर व कर्तव्य निष्ठ भूमी अभिलेख कार्यालय अधिक्षक अधिकारी होते. त्यांनी संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र धम्म प्रचार आणि प्रसार कार्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचे महान अनुयायी सम्राट अशोकाच्या राजशिष्टाचाराचे प्रतिक आणि संविधानिक सार्वभौम लोकशाही प्रधान भारतीय शासन प्रशासनातील राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभांची उभारणी करण्याचे महान कार्य केले. या शिवाय त्यांनी धम्म चळवळ सर्व दूर नेण्यासाठी गतिमान करण्यासाठी जागतिक स्तरावर धम्म संगीतींचे कुशल संयोजन केले होते. समाजातील गोरगरिबांचे आधारस्तंभ असलेल्या महान धम्म प्रचारक दानशूर अशोक शिलवंत यांच्या आकस्मित निधनाने धम्म चळवळ पोरकी झाली. त्यांच्या धम्म कार्यास क्रांतिकारी जयभीम आणि भावपूर्ण आदरांजली.

No comments:
Post a Comment