रेल्वे परिसरातील गुन्हेगारांवर ड्रोनची नजर !!
रूळ ओलांडणाऱ्यांवरही वचक.....
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी, त्याचबरोबर रूळ ओलांडणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे सुरक्षा दलाने उपनगरीय मार्गावर एक ड्रोन
कॅमेरा कार्यरत केला असून आणखी एक कॅमेरा लवकरच सज्ज केला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक ड्रोन कॅमेरा आहे. रेल्वे यार्डमधील मालमत्तेची चोरी होते. यार्डमध्ये प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक नेमणे शक्य नाही. सुरक्षारक्षकांचे काम सोपे करण्यासाठी ड्रोन कॅमेरा घेण्यात आला व यार्डवर देखरेख ठेवण्यात आली.
या ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर रेल्वे हद्दीतील गुन्हेगारीवरही नजर ठेवण्यासाठी करता येईल का ? याचा विचार सुरू होता. त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आल्यानंतर कल्याण उपनगरीय स्थानकाच्या हद्दीत प्रथम हा कॅमेरा कार्यरत करण्यात आला. ज्या रेल्वे स्थानकाच्या हद्दीत अधिक गुन्हे घडतात, तेथे ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितले. या कॅमेऱ्यातून छायाचित्रही काढता येते.
उपनगरीय स्थानक हद्दीत रुळांवर अथवा फलाटाजवळ गुन्हा घडला आणि ड्रोन कॅमेऱ्यात ती घटना टिपली गेली तर ते हाताळणाऱ्या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला ते एका स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे तो त्वरित संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याला याची माहितीही देईल. तसेच यामुळे गुन्हेगाराचा मागही काढणे शक्य होईल, अशी माहिती त्यांनी दिली. शिवाय रेल्वे हद्दीत मोठय़ा प्रमाणात नागरिक रूळ ओलांडून नागरिक जात-येत असतात. यामुळे अपघातांचाही धोका संभवतो. अशा घटनांना आळा बसेल.

No comments:
Post a Comment