कल्याण ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाची वाढ, तालुका वैद्यकीय अधिकारी सांगतात जबाबदारी ग्रामपंचायतीची ?
कल्याण, (संजय कांबळे) : ऐकी काळी कोरोनाच्या पेशंट ला बेड मिळत नसल्याची अवस्था निर्माण झालेल्या कल्याण तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू पाहत असून इतक्या गंभीर परिस्थिती बाबतीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मसाले यांना विचारले असता ही जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची आहे असे म्हणून खांदे उडवून मोकळे झाले.
मागिल वर्षी कल्याण तालुक्यात शेकडो कोरोना पेंशट आढळून येत होते. दररोज इतके रुग्ण वाढत होते की परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती. कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा या गावातील पेशंट ला तर कोविड सेंटर मध्ये बेड मिळत नव्हते. बेड न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. यावेळी प्रशासनाला पत्रकारांनी धारेवर धरले होते. सुदैवाने काही महिन्यांनंतर कोरोनाची तीव्रता कमी झाली व सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला.
परंतु आता पुन्हा राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जाते आहे. याची सुरुवात देखील झाली आहे. केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर तालुक्यात तब्बल १४ कोरोनाचे पेंशट आढळून आले आहेत. तसेच हायरिस्क चे पेंशट १९ हजार ९२६ इतके आहेत. एकूण १४ पैकी काही पेंशट हे म्हारळ ग्रामपंचायतीचे हद्दीतील असून येथील ५०/६० हजार लोकसंख्या पाहता येथे कोरोना चा कहर व्हायला वेळ लागणार नाही. तसेच शेजारच्या वरप, कांबा येथील नागरिकांची बेजबाबदारी पाहता इकडे रुग्ण वाढ होईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
या वाढणा-या पेंशट बाबतीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधाळे यांना विचारले असता ते म्हणाले 'हि जबाबदारी' त्या ग्रामपंचायतीची आहे असे म्हणून खांदे उडवले. तर म्हारळ गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकदा तरी म्हारळ ग्रामपंचायतीला भेट दिली का? आढावा घेतला का? केवळ आॅफिस मध्ये बसून वल्गना करणाऱ्या अशा अधिका-याची तालुक्यात गरज आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. तर कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे आणि उपसभापती रमेश बांगर यांना विचारले असता, बघतो, करतो, माहिती घेतो. अशी मुळमुळीत उतरे दिली. त्यामुळे नागरिकांनी मागील कटू अनुभव पाहता या अधिकारी व लोकप्रतिनिधी वर ज्यादा अवलंबून न राहता स्वतः सतर्क राहून काळजी घ्यायला हवी अन्यथा पुन्हा बेड शोधावा लागेल असा गंभीर इशारा या निमित्ताने द्यावा असे वाटते.

No comments:
Post a Comment