Saturday 24 April 2021

बुंरगुडा फेम भारुडरत्न निरजंन भाकरे यांचे निधन, राज्य व देशाबाहेर समाजप्रबोधन, अनेक पुरस्कारांनी सन्मानीत !!

बुंरगुडा फेम भारुडरत्न निरजंन भाकरे यांचे निधन, राज्य व देशाबाहेर समाजप्रबोधन, अनेक पुरस्कारांनी सन्मानीत !!


कल्याण, (संजय कांबळे) : 'बुंरगुडा होईल बया ग तुला बुंरगुडा' या भारुडातून समाजप्रबोधन करणारे तसेच अनेक मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भारुडरत्न निरजंन भाकरे यांचे नुकतेच दु:खद निधन झाले असून कला क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे 


निरंजन भाकरे यांचा जन्म. १० जून १९६५ औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे झाला. निरंजन भाकरे यांनी लोककलेच्या माध्यमातुन, भारुडांच्या माध्यमातुन अख्ख्या महाराष्ट्राची मने जिंकली होती. सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा, दम दमा दम, ट्रिक्स मिक्स रिमिक्स, धिना धिन धा, तसेच झी मराठी वरील मराठी पाऊल पडते पुढे, अवघा रंग एक झाला, महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र माझा इ. अशा अनेक कार्यक्रमांमधुन निरंजन भाकरे यांनी रसिकांच्या मनात घर केले होते. "तुला बुरगुंडा होईल बया गं" या भारुडानं तर महाराष्ट्रच नाही, भारतच नाही, तर अमेरिका सुद्धा त्यांनी गाजवुन टाकली होती.


खरे तर भाकरेंना वडिलांकडूनच भजनाची परंपरा लाभली. वडील झोळणीत घालून झोकां देत भजन, पोवाडे गात. यातूनच नकळत त्यांच्यावर कलेचे संस्कार होत गेले. शालेय शिक्षण झाल्यावर पुढे औरंगाबाद एमआयडीसीमध्ये लुपीन या औषध निर्मिती कंपनीत १० रुपये हजेरीने कामाला लागले. लग्न झालं, आणि संसाराचा गाढा ओढत त्यांनी छोट्या-मोठ्या कलापथकांतून पेटीवादक म्हणून पैसा कमवण्यास सुरुवात केली. अशातच कलापथकाच्या दौऱ्यावर असताना ठाणे जिल्ह्यात एक चहाच्या टपरीवर ‘लोकसत्ता’ वाचताना अशोकजी परांजपे यांचं चरित्र त्यांच्या वाचनात आलं आणि जणू त्यांना आशेचा नवा किरण दिसू लागला. निरंजन भाकरेंनी अशोकजींची भेट घेण्यासाठी औरंगाबाद गाठले. अशोकजींनी विचारपूस करत ‘तुला लोककलेबद्दल काही येतंय का?’ असं विचारताच भाकरेंनी त्यांना भारूड म्हणून दाखवलं. त्यांना ते आवडलं व पुढे भाकरे त्यांच्याच कुटुंबाचा भाग असल्याप्रमाणे दर शनिवार, रविवार घरी जाऊ लागले. अशोकजींनी सुद्धा भारूड कलेबद्दल त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. पुढे अशोकजींना सोंगी भारुडाचे शूटिंग करायचे होते. अशोकजींनी इंडियन नॅशनल थिएटरच्या तंत्रज्ञांच्या सोबतीने भाकरेंना घेऊन सोंगी भारुडाचे शूटिंग केले. त्यांना आणि आय.एन.टी. च्या कर्मचाऱ्यांना ते फारच आवडले. इथूनच निरंजन भाकरेंच्या भारूड प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. भाकरेंची भारुडं महाराष्ट्रभर गाजू लागली. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे मिळवली. पुढे त्यांनी १९९६ ते २००० मध्ये व्यसनमुक्ती पहाट अभियानात सतत चार वर्षे प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली. अशीच यशाची उंच शिखरे गाठत असताना पुन्हा अशोकजींनी भाकरेंचे सोंगी भारूड मुंबईकरांना दाखवायचे ठरविले. त्या अनुषंगाने अशोकजी निरंजन भाकरेंच्या भारुडाची जाहिरात सुद्धा वर्तमानपत्रातून स्वतः प्रसिद्ध करत होते.
या प्रयोगानंतर निरंजन भाकरेंचे आयुष्यच बदलून गेले. त्यातच पुढे दया पवार प्रतिष्ठान संकल्पनेतून तसेच डॉ. प्रकाश खांडगे यांच्या लेखणीतून “लोकोत्सव” हा कार्यक्रम ठाणे येथे संपन्न होणार होता. त्या कार्यक्रमातदेखील भारूड सादर करण्याची संधी भाकरेंना चालून आली. भाकरेंनी सादर केलेला बुरगुंडा अशोक हांडेंना खूप आवडला. पुढे त्यांनी “मराठी बाणा” या आपल्या कार्यक्रमात भाकरेंना बुरगुंडा सादर करण्याची संधी दिली गेली आणि भारूडकार निरंजन भाकरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले. भारूडकार म्हणून प्रकाशझोतात असतानाच त्यांना २००७ चा राज्य सांस्कृतिक लोककला पुरस्कार त्यांच्या पत्नीसह जाहीर झाला.

'मराठी बाणा’ मुळे महाराष्ट्रसह गोवा, गुजरात, मध्यप्रदेश इतकेच काय तर अमेरिकेतील शिकागो इथल्या रसिकांनादेखील त्यांच्या बुरगुंडा भारुडाची जादू अनुभवायला मिळाली. परंतु या दरम्यान, वडीलभावाने भाकरेंना घर आणि गावापासून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. संपत्तीचं वाटप व्हावं म्हणून तगादा लावला. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना सोबतीला असलेले कलावंत त्यांच्या पासून तोडले. पण त्याही परिस्थितीत शिवसिंग राजपूत या सोंगाड्या सहकाऱ्याने भाकरेंना मदतीचा हात दिला. हिमतीने भाकरेंनी पुन्हा पार्टी बांधली. पुन्हा एकदा एकनाथी भारूड गाजू लागले. त्याचेच फळ म्हणून अखिल भारतीय नाट्य संमेलने, साहित्य संमेलने, लोककला संमेलने, संत गाथा अशा अनेक लोकप्रिय कार्यक्रमांतून त्यांनी आपले लोककलेचे सादरीकरण केले. आपल्या प्रतिभेच्या जोरावर निरंजन भाकरे परव्युतर पदवी घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत येऊन विद्यार्थ्यांना भारुडाचे प्रशिक्षण देत आहेत. 

नुकतीच निरंजन भाकरे यांनी ९० मीटर कापडाचा पायघोळ तयार करून घेतलेली गिरकी चर्चेत होती. मुंबईतील एका कार्यक्रमात साडेआठ किलोच्या या पायघोळा सह २० किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली होती. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुडय़ा जोशी, भविष्यकार आणि त्यांचे प्रख्यात भारुड या सर्व पात्रांना रसिकांनी भरभरून दाद दिली.  या ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती. भारुडाला जिवंत ठेवणारा हा गुणी कलावंत नेहमी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवत असे. रहिमाबाद सारख्या दुर्गम भागातून आलेल्या भाकरेंचे सामाजिक भानही तितकेच प्रखर होते. निरंजन भाकरे यांनी लॉक डाऊन च्या दरम्यान गरीब कुटुंबांना किराणा साहित्य मदत करून सामाजिक कार्य केले होते. त्यांनी आपल्या कार्यक्रमांद्वारे अनेकांना व्यसनमुक्त केले तसेच ते आजारी गरीब कलावंतांना वैद्यकीय खर्चाची मदत नेहमीच करत आले होते. लोककलांचे जतन, संवर्धन व्हावे म्हणून धडपड करणे हा त्यांचा स्थायीभाव होता, पण सपत्निक देहदानाचा संकल्प करणारे भाकरे हे पहिले लोककलावंत होते. 

अशा गुणी कलाकाराचे नुकतेच निधन झाले असून यामुळे कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.' त्यांच्या जाण्याने समाजप्रबोधन करणारा तसेच भारुड हा कलाप्रकार देश विदेशात पोहचवणारा चांगला, कलाकारास मुकलो अशी प्रतिक्रिया जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...