Saturday, 5 June 2021

ठाणे जिल्हायात एक हजार तीनशे चाळीस क्टिंटल बियाणे, शहापूर - मुरबाड तालुक्यात सर्वाधिक मागणी, कल्याणात शेतीच्या कामांना वेग!

ठाणे जिल्हायात एक हजार तीनशे चाळीस क्टिंटल बियाणे, शहापूर - मुरबाड तालुक्यात सर्वाधिक मागणी, कल्याणात शेतीच्या कामांना वेग!


कल्याण, (संजय कांबळे) : राज्यात मान्सून दाखल झाल्याने जिल्हा परिषदेचा कृषी विभाग देखील सजग झाला असून जिल्ह्य़ातील ५ तालुक्यातील 'बळीराजा' साठी तब्बल १ हजार ३४० क्टिंटल विविध जातीचे भात बियाणे वाटप करण्यात आले असून शहापूर आणि मुरबाड तालुक्यातून सर्वाधिक मागणी होत आहे. तर कल्याण तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणी पुर्व शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे.


कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही. कोरोना मुळे भाजीपाला लागवड करुन देखील म्हणावे तसे यश आले नाही. काहीचा भाजीपाला तर कवडी मोल किंमतीत विकावा लागला. तर वेळेवर वाहन न मिळाल्याने तो शेतातच सडला. एकूणच बळीराजा  पूरता ग्रासला, पिसला गेला आहे.

सध्या कोरोनाचे संकट थोडे कमी होत आहे. त्यामुळे यावेळी पुर्ण ताकदीनिशी शेती करायची असे शेतकऱ्यांनी ठरवले आहे. कारण उत्पन्न चांगले आले तर कोरोनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढता येईल या  व नव्या उमेदीने शेतकरी कामाला लागले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्य़ात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. यामध्ये मुरबाड आणि शहापूर तालुक्यात सर्वाधिक भात घेतात. तर कल्याण, भिवंडी व अंबरनाथ तालुक्यात मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाल्याने हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या तालुक्यासाठी कृषी विभागाने सुमारे १ हजार ३४० क्टिंटल भात बियाणे मागवले आहे. यामध्ये सुवर्णा, जया, म्हसोरी, कर्जत ३,७,कोयम्टूर ५१, आदी जातींचा समावेश आहे. हे बियाणे जिप सेस फंडातून ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. तसेच जिल्हायात इतर सर्व कृषी निविष्टा केंद्रावर विक्री साठी उपलब्ध आहे ५० टक्के अनुदानावरील भात बियाणे हे मर्यादित असल्याने ते प्राधान्यक्रमाने शेतकऱ्यांना दिले जाते असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुरेंद्र काळे यांनी सांगितले. 

कल्याण तालुक्याचा विचार केला तर.अनेक गावातील शेती क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे परंतु ग्रामीण भागातील आपटी, उतणे चिंचवली, बापसई, राया, ओझल्री, नडगाव, घोटसई, गोवेली, मामणोली, चौरे, मानवली, गेरसे, कोसले, वेळे, काकडपाडा, उशीद, रायते, आणे भिसोळ, वासुद्री सांगोडा, फळेगाव, खडवली, मांजर्ली आदी गावांमध्ये भात शेती मोठ्याप्रमाणात केली जाते. तालुक्यात १२ हजारांच्या आसपास शेतकरी आहेत. त्यामुळे पेरणी पुर्वीच्या कामाला सुरुवात झाली आहे. नांगरणी, बांधबंदिस्ती, शेतातातील गवत, पालापाचोळा वेचून शेत पेरणीसाठी तयार करणे आदी कामांची लगबग सुरू झाली आहे. कोरोना मुळे कोणीही बाहेर जात नाही. त्यामुळे घरातील सर्व लहान थोर मंडळींचा शेतीचा कामासाठी वापर केला जातो असे आपटी गावातील शेतकरी वंसत शिसवे रवी शिसवे आणि राजेश शिसवे यांनी सांगितले. यंदा वरुणराजाने चांगली साथ दिली तर पीक उत्तम येईल असे ही हे शेतकरी म्हणाले. त्यामुळे देव करो, कोरोनाने मारले, पण निसर्गाने तारले अशी म्हणन्याची वेळ बळीराजा वर येवो हीच अपेक्षा.

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...