रोटरी क्लब चिपळूणच्या अध्यक्षपदी प्रसाद सागवेकर !
*"सेक्रेटरीपदी अविनाश पालशेतकर तर खजिनदारपदी डॉ. निनाद साडविलकर"*
चिपळूण - विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब चिपळूणच्या अध्यक्षपदी प्रसाद सागवेकर यांची तर सेक्रेटरी पदी अविनाश पालशेतकर आणि खजिनदारपदी डॉ. निनाद साडविलकर यांची नुकतीच अभिनंदनीय निवड करण्यात आली.
व्यवसायाने सुवर्णकार असलेले श्री प्रसाद अनंत सागवेकर हे बीकॉम असून चिपळूण तालुका सुवर्णकार नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आहेत. गेले अनेक वर्षे ते विविध क्षेत्रात सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असून गेली अकरा वर्षे रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. सेक्रेटरी पदी निवड झालेले श्री. अविनाश शंकर पालशेतकर हे एमकॉम असून डीबीजे महाविद्यालयामध्ये गेली अठरा वर्षे लेक्चरर म्हणून काम करीत आहेत. सामाजिक कार्याची आवड असलेले श्री.अविनाश पालशेतकर पाच वर्षांपूर्वीपासून रोटरी क्लबमध्ये सक्रिय झाले. गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी ते विशेष प्रयत्नशील असतात. खजिनदारपदी निवड झालेले डॉ. निनाद नयन साडविलकर हे एमडी (आयुर्वेद) असून आयुर्वेद चिकित्सक व अध्यापक म्हणून गेली दहा वर्षे चिपळूणमध्ये कार्यरत आहेत. शहरातील चिंचनाका येथे त्यांचे आरोग्यवर्धन आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय असून एमईएस आयुर्वेद महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत. आजपर्यंत त्यांनी 25 पेक्षा अधिक आयुर्वेद जनप्रबोधन व्याख्याने दिली असून त्यांचे सहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत. रोटरी क्लबचे ते मेंबर असून ओएमजी अमेझिंग आयुर्वेद या ब्लॉग वर त्यांचे लिखाण चालू आहे.
लोटे येथील असिस्टंट गव्हर्नर श्री. पद्माकर सुतार यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रसाद सागवेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने या वर्षामध्ये भरीव काम करून रोटरी क्लबची सामाजिक जबाबदारीची परंपरा आम्ही कायम ठेवू, कोरोनाच्या या महासंकटामध्ये आलेली ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, कोरोना महामारीमध्ये हतबल झालेल्या नागरिकांना दिलासा देतानाच आरोग्यविषयक आणि शैक्षणिक उपक्रमांवर भर देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी मावळते अध्यक्ष श्री.प्रशांत देवळेकर यांनी आपल्या कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा घेऊन सर्वांचे आभार मानले तर नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
रोटरी क्लब चिपळूणच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या निवडीमुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे फोनद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..
No comments:
Post a Comment