महाराष्ट्रात होताच निर्बंध शिथिल; परप्रांतीयांचा ओघ वाढला !
कल्याण : राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून करोना प्रतिबंधक लशींची दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना उपनगरीय रेल्वे प्रवासातून मुभा दिली आहे. तसेच उपाहारगृहे, दुकानांना रात्री १० पर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गावी निघून गेलेले परप्रांतीय पुन्हा मुंबई-ठाण्याकडे वळू लागले आहेत. करोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात आल्याने राज्यात निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. उपाहारगृहे आणि कंपन्यांना निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे टाळेबंदीप्रमाणे पुन्हा सर्व व्यवहार ठप्प होतील या भीतीने अनेक परप्रांतीय मजुरांनी त्यांच्या गावचा रस्ता धरला होता. दुसरी लाट ओसरत असताना र्निबधांमध्येही शिथिलता मिळू लागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लशींच्या दोन मात्रा पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवासास मुभा मिळणार असल्याचे जाहीर झाले. तसेच उपाहारगृहे, दुकान मालकांनाही रात्री १० पर्यंत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. याची माहिती मिळताच परप्रांतीयांनी पुन्हा मुंबई, ठाण्याची वाट धरण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई ठाण्यातील उपाहारगृहे, कंपन्या, दुकाने पूर्णपणे सुरू झालेले आहेत. या कंपन्या किंवा उपाहारगृहांमध्ये काम करणारे मजूर हे कुटुंब गावी ठेवून मुंबई, ठाण्यात राहतात. उपाहारगृहे, कंपन्या, दुकाने पूर्णपणे सुरू झाल्याने मुंबईत दाखल होणाऱ्या परप्रांतीयांमध्ये कुटुंबांपेक्षा मजुरांचे प्रमाण अधिक दिसत आहे.
No comments:
Post a Comment