म्हारळ गावातील वार्ड क्रमांक दोन मधील गैरसोयी बाबतीत महिला आक्रमक, मोर्चाचा इशारा? भेदभाव करित असल्याचा आरोप !!
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या व श्रीमंत असलेल्या म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक मधील गैरसोयी बाबतीत येथील महिला आक्रमक झाल्या आहेत, आम्ही माणसं नाही का? असा प्रश्न उपस्थित करून ताबडतोब मुलभूत सोईसुविधा न दिल्यास ग्रामपंचायत विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आमच्या आदिवासी वस्ती बाबत का भेदभाव केला जातो, असा सवालही उपस्थित केला आहे.
कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत ही उल्हासनगर शहराला लागून आहे, तर कल्याण मुरबाड मार्गावर आहे, १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. गावात बहुतेक ठिकाणी सिंमेट काँक्रीटीचे रस्ते झाले आहेत. परंतु वार्ड क्रमांक २ येथील जुनी आदीवासी वस्ती मात्र अनेक मुलभूत सोईसुविधा पासून वंचित आहे.साधारण पणे १००/१५० लोकवस्ती असलेल्या या वस्ती मध्ये रस्ते उखडलेले, पाईपलाईन फुटलेल्या, गटारे तूटलेली, कच-याने भरलेली अशी अवस्था आहे. पावसाळ्यात तर गटाराचे पाणी रस्त्यावर व ते पाणी घरात अशी परिस्थिती असल्याचे येथील महिलांचे म्हणने आहे.
या वस्ती मधील साधारण पणे १००/१५० मीटर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून ८/९ महिने झाले आहेत. परंतु अद्याप येथे काम सुरू झाले नाही. पण काल येथे थोडीफार खडी टाकल्याने येथील महिलामध्ये संताप निर्माण झाला आहे, कारण त्यांचे म्हणने आहे की या खडीने तात्पुरते खड्डे बुजवले जातील, त्यामुळे ही खडी वाहून जाईल व पुन्हा तिच परिस्थिती निर्माण होणार, परत येथे घाणीचे साम्राज्य, कच-याचे ढिग, दुर्गधीं, पसरणार, रस्ता नसल्याने घंटागाडी येत नाही, तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीला ओळखले जाते, मग आमच्या बाबतीत इतकी गरीबी का? आम्ही माणसं नाही का? असा सवाल येथील सिमा नागेश फसाले, अश्विनी परेल, सुरेखा आगीवले, सुमन परेल, आदी महिलांनी उपस्थित केला आहे. तर मी या वार्डाचा सदस्य या नात्याने येथील नागरिकांची गैरसोय व त्यांचे प्रश्न, अडचणी, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, बीडीओ, सीईओ यांना सांगितले व तक्रारी केल्या, येथील काम मंजूर असताना का केले जात नाही? आता तात्पुरते करुन पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण करायची आहे का?आता हे ऐकण्याच्या तयारीत नाहीत, त्यांना मुलभूत सोईसुविधा मिळाल्या नाहीत तर ते ग्रामपंचायत व कल्याण पंचायत समिती वर मोर्चा काढतील असा इशारा ग्रामपंचायत सदस्य योगेश देशमुख यांनी दिला आहे,तर संबंधित सदस्य, या वार्डातील नागरिक व सरपंच, उपसरपंच याची एक बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्यात येईल असे म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी वाघचौरे यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment