भाजप विरुद्ध सेना वाद शिगेला, सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिक पोलिसांत तक्रार !!
भिवंडी, दिं, 25, अरुण पाटील, (कोपर) :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये तक्रार युद्ध पेटले आहे. नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सामनाच्या संपादकांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करून नाशिकमध्ये पोस्टर झळकवले आहे, त्यामुळे तक्रार देण्यात आली आहे.
नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रार अर्जावर सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे.
त्याचबरोबर नाशिकमध्ये राणें विरोधात पोस्टर झळकवले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, राणें विरोधात नाशिक पोलिसांतच तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडूनही नाशिक पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या महात्मा नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणी असं विधान केलं असतं तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे.
महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे व एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे कृतीनं दाखवून द्यायची हीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गानं उखडलेलेच बरे !.
पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या ? आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारनं तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचं दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवळायची काय?
महात्मा नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करुन सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केंद्रीय मंत्री नारोबा राणे यांनी शपथ ग्रहण केल्यापासून जे दिवे पेटवले व अक्कल पाजळली त्यामुळे केंद्र सरकारची मान शरमेनं खाली झुकली आहे.
No comments:
Post a Comment