Friday, 13 August 2021

कोकणातील महाड,खेड आणि चिपळूणच्या पूरग्रस्त भागात श्री गणेश मंदिर ट्रस्ट रानवलीतर्फे ११३ कुटूंबीयांना २,४५,५००/- रु रोख स्वरुपात मदत !

कोकणातील महाड,खेड आणि चिपळूणच्या पूरग्रस्त भागात श्री गणेश मंदिर ट्रस्ट रानवलीतर्फे ११३ कुटूंबीयांना २,४५,५००/- रु रोख स्वरुपात मदत !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/श्रीराम वैद्य) :

        शुभ्र पांढरा मोगरा, नित्य सांगे मानवाला। दुःख सारे विसरून, आनंद द्यावा इतरांना ॥

            श्रीक्षेत्र वरदविनायक गणेश मंदिर रानवली (धर्म क्षेत्र रानवली) तर्फे पूरग्रस्त कोकण दौ-यासाठी श्री गणेश मंदिर ट्रस्ट रानवली संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष विजय वाऊळ, खजिनदार हरिश्चंद्र शिपुरकर, मा.अध्यक्ष  विठोबा तांबडे, सहसचिव संतोष वरपे, तसेच सर्वश्री विठोबा हावरे, रमेश शिपुरकर, संदेश वैद्य, चंद्रकात शिपुरकर, राजेंद्र ग. तांबडे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त महाडमधील २१ साळी कुटुंबीय, खेडमधील १३ आणि चिपळूण येथील ७९ अशा एकूण ११३ कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. मदत नव्हे जणू 'श्री'चा प्रसाद; आपद्ग्रस्त कोकणवासीय समाजबंधू-भगिनींना संकटाचे निर्मूलन लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी हा प्रसाद स्वीकारावा असे आवर्जून सांगितले. "आपल्यावर या अस्मानी-सुलतानी कोसळलेल्या संकटकाळात कर्तव्यभावनेने आमची सामाजिक बांधिलकी समजून श्री गणेश मंदिर ट्रस्ट च्या फंडातूनच आपणास मदत घेऊन आलो आहोत असे समजावून एकूण ११३ पूरग्रस्त कुटुंबीयांना ₹२,४५,५००/- रोख स्वरूपात मदत करण्यात आली.
           मदतीला महाड येथून प्रारंभ केला. राजेश डोईफोडे, मंदार आंबुर्ले यांनी आपद्ग्रस्त कुटुंबीयांना भेटविण्याकामी सहकार्य केले. त्याचप्रमाणे संतोष व सौ. पद्मा शिपुरकर यांनी महाडवासियांची झालेली दयनीय परिस्थितीची माहिती दिली. अतिशय बिकट परिस्थितीत प्रत्येकाला कशाप्रकारे सहकार्य केले याबद्दलचा तपशील सांगितला. आजतागायत आलेल्या एकूण मदतीचा आढावा सांगितला. आम्ही आणलेली मदत म्हणजे धनलक्ष्मी व श्री वरदविनायकाचा प्रसाद समजून उभयतानी नम्रपणे स्वीकारली. अशाचप्रकारे महाडमधील वीस कुटुंबीयांनी श्रीचा प्रसाद म्हणून स्वीकारून 'प्रत्येकाचे मन आज १३/१४ दिवसांनी प्रफुल्लित झाल्याचे दिसले. त्यानंतर खेडला जाईपर्यंत रात्र झाली होती. खेड समाजाने सर्वांच्या राहाण्याची सोय भव्य अशा भगवान श्री जिव्हेश्वर मंदिरात केली होती. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक आणि द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. रात्री भोजनाची व्यवस्था रमेश घटे यानी उत्तमप्रकारे केली होती. तसेच खेड स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ बापू हरवंदे व अनेक समाज बांधव सोबत येऊन संकटग्रस्त समाज बांधवांना भेटण्यासाठी सहकार्य केले. सर्वजण अतिशय आनंदाने आणि उत्साहीत होऊन आम्ही दिलेला 'श्री'चा प्रसाद स्वीकारीत होते. हे पाहून आम्हालाही एक प्रकारचे कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभले. खेड शहरात मुख्यत्वे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रत्येकाचे दुकान पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाले होते. एका घरात श्रीच्या मूर्तीचा कारखाना होता तर तेथे त्या मूर्तींचे विसर्जन झाल्याचे दिसत होते. अतिवृष्टीमुळे आपल्या बांधवांची परिस्थिती खूपच शोचनीय झाल्याचे दिसत होते. "अशाप्रसंगी आपण आणलेला श्री वरदविनायकाचा प्रसाद हा आमच्यासाठी आज लाखमोलाचा आहे" असे खेडवासियांनी आवर्जून सांगितले.
    चिपळूणला पोहचल्यावर येथे तर पुराने थैमानच घातले होते. परिस्थिती अतिशय भयानक आणि भयावह दिसत होती. आयुष्यभर कष्ट करून उभारलेले संसार निसर्गाच्या दोन तासाच्या दरम्यान होत्याचे नव्हते झाले होते. अजूनही काहींच्या घरी चिखलाचे साम्राज्य होते, सांडपाणी साचलेले होते, लाईट नव्हते. सर्वत्र दुर्व्यवस्था होती. सर्व समाजबांधव त्रासलेले दिसत होते. एक मात्र बरे होते, सर्वत्र साफसफाईची कामे चालू होती. अशाही परिस्थितीत चिपळूणच्या बांधवांनी आम्हा सर्वांचे श्री विठ्ठल मंदिरात जमून स्वागत केले. रत्नागिरी जिल्हा स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष शिरीष काटकर यानी दि. २२ - २३ जुलैच्या पूरपरिस्थितीची माहिती दिली. त्यावेळची स्थिती सांगताना त्याना अश्रू आवरत नव्हते. तरीही आपल्या समाजाची परिस्थिती लवकरात लवकर मूळपदावर येण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करू ही जिद्द त्यांच्या ठायी दिसली. शासनाकडून अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहाण्याची ग्वाही त्यानी दिली. तसेच स्थानिक पेठमाप संस्थेचे अध्यक्ष श्री. मिलिंद गोंधळी यानी श्री वरदविनायक  गणेशाबद्दलची प्रचिती व ख्याती सांगितली तसेच समाज संघटनेबाबत स्तुती केली. आमच्या संस्थेचे चिपळूण प्रतिनिधी विजय वैद्य यानी उपस्थित कुटुंबांची ओळख व पूरग्रस्तांची माहिती दिली. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे हितचिंतक श्री. दिलीपशेठ हरवंदे यांच्याकडून देखिल - ते पूरग्रस्त असूनही - आम्हाला सहकार्य लाभले. त्यांचे या पुरात अतोनात नुकसान झाले आहे. आम्हाला दिसलेल्या परिस्थितीबद्दल जेवढे लिहू तेवढे कमीच आहे. त्यासाठी शब्द अपुरे आहेत. श्री विठ्ठल मंदिरात जास्तीतजास्त समाज बांधवांनी येऊन  श्रींचा प्रसाद स्वीकारला. सर्वांमुखी एकच वाक्य होते "आम्ही गेले १४/१५ दिवस खूप वाईट परिस्थितीत होतो. आज आपण प्रत्यक्ष भेटून श्री वरदविनायकाचा प्रसाद दिलात!" याबद्दल प्रत्येकाने श्री गणेश मंदिर ट्रस्ट व पदाधिकारी मंडळाचे मनापासून आभार मानले.

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अर्जप्रक्रिया सुरु !

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अर्जप्रक्रिया सुरु ! पुणे, प्रतिनिधी : भारतातील युवा वर्गाला आंतरवासितेच्या (...