तळीये दुर्घटनेमधून बचावलेल्या पूजाला
भिवंडीतील ' साई फाउंडेशन ' कडून रक्षाबंधनची 'अनोखी' भेट !
अरुण पाटील (कोपर), भिवंडी, दिं, 23 :
एक महिन्यापूर्वी झालेल्या दुर्घटनेत महाड तालुक्यातील तळीये गावात मुसळधार पावसात डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ८४ गावकऱ्यांचा बळी गेला. याच गावातील २३ वर्षीय पूजा कोंडलेकरच्या कुटुंबातील सर्वांचा बळी जाऊन ती एकटीच वाचली आहे. आज तिचा शिक्षण, पालन पोषणसह विवाहाची जबाबदारी घेऊन भिवंडीतील भावांनी रक्षाबंधनच्या दिवशी तिच्याकडून राखी बांधून घेतली आहे. आता पूजाला दुःखाच्या डोंगरातून नवीन सुखाची वाट दाखवत आधार दिल्याने तिच्याशी जिव्हाळ्याचे नवीन भावा बहिणीचे नाते जुळल्याचे पाहायला मिळत आहे.
' साई फाऊंडेशन' चे अध्यक्ष प्रदीप शेट्टी भिवंडीतील साई फाऊंडेशनच्या ५० कार्यकर्त्यांची टीम मदतीला एक महिन्यापूर्वी कोकणात पावसाने हाहाकार माजवून अनेकांचा बळी घेतला. त्यांनतर मानवतेच्या दृष्टीने राज्य भरातून शेकडो सामाजिक संघटनांनी कोकणात मदतीचा ओघ सुरू केला. तर काहींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. यामध्ये भिवंडीतील साई फाऊंडेशनच्या ५० कार्यकर्त्यांनी चिपळूणसह आजूबाजूच्या दुर्घटनाग्रस्त गावांना भेटी देत, त्यांना अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य देऊन मदत केली. शिवाय त्यांच्या घरांची दुरुस्ती व साफसफाई करत श्रमदानही केले होते.
महाड तालुक्यातील तळीये गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळला होता. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगडं पडली, झाडे पडली, मातीचा ढिगारा पडला. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. या गावातील ३५ घरेही जमीनदोस्त झाली. त्यामध्ये पूजाचेही घर होते. त्यांनतर २० दिवसांनी साई फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांना गावकऱ्यांनी संपर्क करून मदत मागितली. त्यावेळी पूजाची व्यथा त्यांच्या समोर आल्याने त्यांनी पूजाशी बहिणी भावाचे नाते निर्माण करून तीची संपूर्ण जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा केला.
No comments:
Post a Comment