मोहने येथील अनधिकृत बांधकामाला आशीर्वाद कोणाचा !! *नगरसेविकेची तक्रार तरीही कारवाई नाहीच*
*कारवाई होत नसल्याने प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांची बदलीची मागणी*
मोहोने : मोहने येथील मुख्य चौकात शिवसेना शाखेच्या बाजूला जी प्लस एक असे अनधिकृत बांधकाम राजरोसपणे सुरू असून या अनधिकृत बांधकामाला आशीर्वाद कोणाचा आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. गेल्या तीन महिन्यापासून या ठिकाणी पालिका अधिकाऱ्यांना न जुमानता सुशांत मिसाळ आणि सिताराम मिसाळ यांनी राजरोसपणे अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले आहे.
या अनधिकृत बांधकामाची तक्रार अनेकदा करून सुद्धा प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत हे दुर्लक्ष करीत असून या अनधिकृत बांधकामाची तक्रार प्रभाग क्र.१४ च्या माजी नगरसेविका सुनंदा मुकुंद कोट यांनी केली आहे.
तक्रार करून १५ दिवस उलटूनही प्रभाग क्षेत्र अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच पालिकेच्या निष्क्रिय धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोझर फिरविणारे अधिकारी या धनदांडग्यांच्या आरसीसी बांधकामावर कारवाई करण्यास धजावत नाहीत. कारवाई करायला भीती वाटते का ?
पालिकेतील नगरसेवकाने किंवा नगरसेविकेने आपल्या प्रभागातील अनधिकृत बांधकामे पालिकेच्या निदर्शनास आणून दिली नाही तर नगरसेवक किंवा नगरसेविकेवर अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातले म्हणून निलंबन होते. या अधिकाऱ्यांचे निलंबन का होत नाही असा संतप्त सवाल सुनंदा कोट त्यांनी उपस्थित केला आहे.
जर नगरसेविकेच्या अर्जावर कारवाई होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी अर्ज करावा की नाही ? कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार की या बांधकामाला पाठीशी घालून संरक्षण देणार याकडे पालिकेच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे.
No comments:
Post a Comment