Friday 29 October 2021

एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळीही अंधारात !! "आज पासून एसटी कर्मचाऱ्यांचे आगारात उपोषण सुरू"

एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळीही अंधारात !!

"आज पासून एसटी कर्मचाऱ्यांचे आगारात उपोषण सुरू"


संदीप शेंडगे/प्रतिनिधी दि. २८ 
कल्याण : एसटी कर्मचाऱ्यांची यावर्षाची दिवाळीही अंधारात जाणार असल्याने संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.


गेल्या वर्षी कोरोना काळात कामगारांना दिवाळी बोनस त्याचप्रमाणे महागाई भत्ता व पगारवाढ देण्यात आली नव्हती. तरीही कामगारांनी कोणतेही आंदोलन न करता कोरोना काळातही आपली नियमित सेवा पुरविली होती.
कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे एसटी महामंडळ सातत्याने दुर्लक्ष करीत असून त्यांना वेठबिगार कामगारांप्रमाणे काम करायला भाग पाडत आहेत.
दिवाळी सण दोन दिवसावर आली असून अद्याप कामगारांना दिवाळी भेट सानुग्रह अत्यंत तुटपुंजे २५००/-   देण्याची महामंडळ प्रशासनाने घोषणा केलेली आहे. तसेच दिवाळीपूर्वी वेतन मिळणार की नाही याची शाश्वती नाही याचाच निषेध म्हणून कामगारांनी कामगार आयुक्त कल्याण यांच्याकडे एक निवेदन देऊन दि.२८ ऑक्टोंबर गुरुवार पासून एस टी महामंडळाच्या कल्याण आगारात राज्यव्यापी उपोषणाचे आंदोलन सुरू केले आहे.


काय आहेत कामगारांच्या मागण्या ?

महागाई भत्ता १२ टक्क्याहून २८ टक्के वाढला असून अद्यापही कामगारांना वाढीव भत्ता दिलेला नाही तसेच महागाई भत्त्याची ३ टक्के थकबाकी देण्यात आलेली नाही.

१ ऑक्टोंबर २०२१ महागाई भत्त्यात २८ टक्के वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्येक पगारात महागाई भत्ता देण्यात यावा.

ऑक्टोंबर महिन्याचे वेतन दिवाळी सण साजरा करण्याकरिता दिवाळीपूर्वी देण्यात यावे.

सण उत्सव साजरा करण्यासाठीची उचल रक्कम १२५०० दिवाळीपूर्वी देण्यात यावी.

दिवाळी भेट पंधरा हजार रुपये रोख देण्यात यावे.


यांसह कामगारांच्या विविध मागण्यांकरिता कामगार कल्याण आगारात उपोषणाला बसले असून या उपोषणास एसटी महामंडळाच्या सर्वच कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे


यामध्ये प्रामुख्याने : महाराष्ट्र एसटी कामगार संघटना महाराष्ट्र एसटी कामगार सेना ; म मो का फेडरेशन ;
राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस इंटक ; महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना ; कास्ट्राईब राज्य परिवहन एसटी कर्मचारी संघटना सहभागी झाले आहेत तसेच अ मा सणभोर, धनंजय रायकर नितीन खंडागळे, दत्तात्रय अडांगळे, यांसह २८७ कामगारांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.


या सर्व संघटनांच्या वतीने कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येईल असे कामगारांनी सांगितले आहे.


या उपोषणाबाबत कल्याण आगार प्रमुख विजय गायकवाड यांना विचारले असता कामगारांचे उपोषण आंदोलन कायदेशीर नसून अत्यावश्यक सेवा कामगारांच्या मागण्या रास्त असून कामगारांनी एसटी महामंडळाच्या इतर कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास मज्जाव करू नये त्यांच्या मागण्यांचा महामंडळ योग्य तो विचार करीत असून लवकरच तोडगा काढण्यात येईल दिवाळी सण तोंडावर असताना कामगारांनी नागरिकांची अडचण लक्षात घेऊन उपोषण करणे योग्य नाही असे गायकवाड यांनी सांगितले आहे.

असे असले तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर सणासुदीच्या दिवसात एसटी कामगार संघटनांनी उपोषण पुकारल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने महामंडळाने कामगारांच्या मागण्यांचा विचार करून योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...