Tuesday, 28 December 2021

कसऱ्यातील डोंगर -पायावाटा पालटून राबवली लसीकरण मोहीम.!!

कसऱ्यातील डोंगर -पायावाटा पालटून राबवली लसीकरण मोहीम.!!


भिवंडी, दिं,28,अरुण पाटील (कोपर) :
         ठाणे जिल्ह्यातील कसारा परिसरातील  दापूरमाळ येथील दोन पाडय़ांमधील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने दोन मोठे डोंगर, रानवाट असा तब्बल १८ किलो मीटरचा पायी प्रवास करून येथील १६३ जणांचे लसीकरण केले. आरोग्य पथकाने जनजागृतीच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या मानसिकतेत बदल करून लसीकरण मोहीम राबविण्यात  आली आहे. या दोन्ही पाडय़ांतील सर्वच नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ठाणे जिल्हा परिषद आरोग्य पथकाच्या या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
            कसारा रेल्वे स्थानकापासून ३५ किलोमीटर अंतरावर दापूरमाळ हा भाग आहे. या भागात २३६ घरांचे दोन आदिवासी पाडे आहेत. पाडय़ांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने आजही येथील नागरिकांना पायी दोन डोंगर पार करून मुख्य शहरात यावे लागते. कसारा येथील आरोग्य केंद्राच्या विहीगाव उपकेंद्राद्वारे येथील ग्रामीण भागात करोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे.
          तीन महिन्यांपूर्वी आरोग्य केंद्रातील अधिकारी दापूरमाळ येथील दोन पाडय़ांमध्ये लसीकरणासाठी गेले होते. त्यावेळी गावातील काही लोक घरात पळून गेले आणि दरवाजांना कडी लावून घेतली. तर, काहीजण रानाच्या दिशेने पळत सुटले. आरोग्य पथकाने लसीकरणासाठी विनंती केली. मात्र, एकाही गावकऱ्याने लस घेतली नाही. अखेर सर्व लशी घेऊन आरोग्य पथकाला पुन्हा माघारी परतावे लागले. त्यामुळे आरोग्य पथक चिंतेत होते. या पाडय़ातील दोन तरुण कामानिमित्ताने कसारा रेल्वे स्थानकात जात होते. रेल्वे स्थानकात प्रवेश मिळविण्यासाठी करोना प्रतिबंधक लशीची मात्रा गरजेची असते. त्यामुळे या तरुणांनी लस घेतल्याची माहिती आरोग्य पथकाला मिळाली. या तरुणांना आरोग्य पथकाने हाताशी धरले. पाडय़ातील एका आशासेविकेचेही लसीकरण आरोग्य पथकाने केले. त्यानंतर आशा सेविका आणि तरुणाच्या माध्यमातून आरोग्य पथकाने लसीकरणा बाबत जनजागृती सुरू केली. लस घेतल्याने काहीच दुष्परिणाम होत नसल्याचे पटवून देण्यात आले. अखेर तीन महिन्यांनी गावातील १८ वर्षांपुढील नागरिक लस घेण्यासाठी तयार झाले.
             बुधवारी सकाळी ठाणे जिल्हा परिषदेचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल भोरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य पथकाने करोना प्रतिबंधक लशी, परिसरातील बालकांसाठी कपडे, खाद्य पदार्थ, औषधे घेऊन निघाले. दोन डोंगर, रानवाट असा ३.३० तास चालत ९ किलोमीटरचे अंतर पार केले. विश्वास निर्माण झाल्याने रहिवाशांची लस घेण्यासाठी गर्दी होऊ लागली. याच संधीचा फायदा घेऊन आरोग्य पथकाने तपासणी शिबिरही घेतले. सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर पुन्हा ९ कि.मी. पायपीट करत पथक परतले.

No comments:

Post a Comment

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...