सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मनसेच्या मागणीस आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद !!
"सुरक्षा रक्षकांचे मागील देयके देण्याचे व सुरक्षा रक्षकांना डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचे मान्य करून पुढच्या महासभेवर तसे गोषवारा ठेवण्याचे आश्वासन"
मुंबई, (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर ) :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नाशिक महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे कार्यरत सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मा. मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या वेळी मा. मनपा आयुक्त श्री. कैलास जाधव यांनी मनसेचे निवेदन स्वीकारतांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सुरक्षा रक्षकांचे मागील देयके देण्याचे व सुरक्षा रक्षकांना डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचे मान्य करून पुढच्या महासभेवर तसे डॉकेट (गोषवारा) ठेवण्याचे आश्वासन दिले. नाशिक मनपात १० ते १२ वर्षांपासून इमाने इतबारे कार्यरत असलेल्या व कोरोना काळातही आपल्या जिवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावलेल्या ४०० सुरक्षा रक्षकांना काढून अत्यंत बेकायदेशीर व अन्यायीरीत्या नाशिक मनपाच्या प्रशासनातर्फे त्यांच्या जागेवर खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्याचे घाट घालत असताना मा. औद्योगिक न्यायालयाने या कामगारांना याच ठिकाणी कायम ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. मात्र नाशिक मनपातर्फे या गोरगरीब कामगारांचा एक वर्षाचा मासिक पगार व इतर देणी थकविण्यात आल्याने ह्या गोरगरीब कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे अधिकृत सदस्य असलेल्या ह्या कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मा. मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले असतांना मा. आयुक्तांनी सुरक्षा रक्षकांची मागील देयके देण्याचे तसेच सुरक्षा रक्षकांना मुदतवाढ देण्याचे मान्य केले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीस इंटक प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कामगार युनियन, महाराष्ट्र माथाडी व सुरक्षा रक्षक युनियन, भा.ज.प. सुरक्षा रक्षक कामगार संघ यांनी पाठींबा जाहीर केला. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण, सरचिटणीस संदीप देशपांडे, कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी, अध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर, प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेवक सलिम (मामा) शेख, नगरसेवक योगेश शेवरे, शहर समन्वयक सचिन भोसले, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, नितीन साळवे, भाऊसाहेब निमसे, विक्रम कदम, रामदास दातीर, योगेश लभडे, खंडू बोडके, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर, कामगार सेनेचे उपचिटणीस तुषार जगताप, सुरक्षा रक्षक सेनेचे चिटणीस कैलास मोरे, उपचिटणीस अर्जुन वेताळ, विजय रणाते, पंकज दातीर, पराग भुसारी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment