Thursday 24 February 2022

रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांचा ५५ किलो गांजा जप्त, तीन तस्कर गजाआड !!

रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांचा ५५ किलो गांजा जप्त, तीन तस्कर गजाआड !!


भिवंडी, दिं,25, अरुण पाटील (कोपर) :

             अमली पदार्थाची खरेदी विक्री करणे कायदेशीर गुन्हा आहे. मात्र चोरट्या मार्गाने गांजा, ड्रग्जसारख्या अमली पदार्थाची खरेदी विक्री सुरु असल्याचे आणखी एका घटनेमुळे समोर आले आहे. भुवनेश्वर कडून मुंबईकडे येणाऱ्या सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत बोगीतून ५ लाख ५३ हजार रुपये किमतीचा तब्बल ५५ किलो गांजा कल्याण आरपीएफने (kalyan rpf) जप्त केला आहे. हा गांजा आणणाऱ्या सम्राट बाबुराव पात्रा, संजू अहमद गाजी आणि अजगर अली बहाद्दूर खान या तिघांना अटक करण्यात आली आहे. 
              हे तिघे भांडत असताना एक्स्प्रेस मध्ये पेट्रोलिंगदरम्यान आरपीएफ जवानांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यांना ताब्यात घेतले. या तिघांना कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांनी हा गांजा कोठून आणला आणि कोणाला त्याची विक्री केली जाणार होती याचा तपास कल्याण रेल्वे पोलिसाकडून सुरु आहे.
              कल्याण आरपीएफचे निरीक्षक भूपेंद्र सिंहच्या मार्गदर्शनाखाली सी. जी. रुपदे यांचे पथक बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईकडे येणाऱ्या भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनन्स सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या बोगीत इगतपुरी ते कल्याण दरम्यान पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान वातानुकुलीत बी-३ बोगीतून प्रवास करणारे तीन प्रवासी आपसात भांडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडे आरपीएफच्या पथकाने विचारणा करत असताना या तिघांमधील एकाने सीट खाली असलेली बॅग आत ढकलण्याचा प्रयत्न केला. या तिघांच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव पाहता त्यांच्यावरील संशय बळावला. यामुळेच आरपीएफच्या जवानांनी या तिघांना सामानासह ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात कल्याण रेल्वे पोलिसाच्या हवाली केले.
              पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे असलेल्या ट्रॉली बॅगेत सुमारे ५ लाख ५३ हजार ९५० रुपये किमतीचा गांजा आढळला. पोलिसांनी या तिघांना तत्काळ अटक करत गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...