चवदार तळे सत्याग्रह क्रांतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर महाड मध्ये, नियोजनाचा अभाव, तूफान वाहतूक कोंडी !
कल्याण, (संजय कांबळे) : २०मार्च १९२७मध्ये ओंजळभर पाणी पिऊन कित्येक कोटी जनतेची तहान भागविणा-या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 'चवदार तळ्यांची क्रांती घडवून आणली. म्हणून एक कवी म्हणतो, तहानलेल्या पाखरांवर, तू कसे उपकार केलेस, एकच ओंजळ प्यायलास "पाणी", पण सारे तळे चवदार केलेस, आणि हाच दिवस क्रांतीदिन म्हणून इतिहासात अजरामर झाला. याच दिवशी देशाच्या कानाकोपऱ्याततून या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर महाड मध्ये आला होता, मात्र नियोजनाच्या अभावामुळे खालापूर ते महाड या रस्त्यावर ६/८ किलोमीटर इतक्या वाहनांच्या रांगा लागल्याने तूफान वाहतूक कोंडी झाली होती. अशाही परिस्थितीत समाधानाची बाब म्हणजे रस्त्यावर वरील विविध गावातील मंडळानी जागोजागी 'थंडपाण्याची' सोय केली होती.
गुराढोरांनाही सहज उपलब्ध होणारे नैसर्गिक पाणी अस्पृश्य समाजास मात्र या कथाकथीत जातीयवाद्यानी नाकारले होते. त्यामुळे हे नैसर्गिक पाणी आहे, आणि त्यावर सर्वांचा समान हक्क, अधिकार आहे अशी गगणभेदी गर्जना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील तळ्याचे ओंजळभर पाणी पिऊन कित्येक कोटी जनतेवर उपकार केले.या घटनेने तळेच चवदार करुन टाकले, हा दिवस 'क्रांतीदिन' म्हणून इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला.
त्यामुळे या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशविदेशातील लोक महाड येथील चवदार तळे येथे येवून नतमस्तक होतात.
गेली दोन वर्षें कोरोना संकटामुळे सर्व बंद असल्याने भीम अनुयायांची घोर निराशा झाली होती. पण यावर्षी सर्व निर्बंध उठविल्याने महाड येथे तूफान गर्दी होणार हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्याची मुळीच गरज नव्हती. पण तरीही, माणगांव, कोलाड, सुधागड पाली, तळा, केळवली, परळी, पुई,आदी ठिकाणी दोन्ही बाजूंनी ६/८ किलोमीटर अंतर इतक्या वाहनांच्या रांगा होत्या, असे असूनही माणगंगा, कोलाड, येथे एक दोन वाहतूक पोलीस व होमगार्ड होते. यामध्ये अजून भरीसभर म्हणजे खालापूर पासून ते महाड शहरापर्यत सर्वच ठिकाणी रस्त्याचे अर्धवट झालेले काम, मधेच उड्डाणपूलाचे रखडलेले कामे, दुभाजकाचा अभाव, धुळीचे लोट आणि या सर्वावर कडी म्हणजे हे सर्व माहिती असूनही रस्त्यावर केलेले मानवनिर्मित अतिक्रमण, अडथळे यामुळे वाहतूक पोलीसांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. याचा भिम अनुयायांना कमालीचा त्रास झाला.
यातून ही समाधानाची बाब म्हणजे आग ओकणा-या उन्हामुळे हैराण होऊन जराही उत्साह, आंनद कमी न करणाऱ्या जनसागरासाठी जागोजागी, गावोगावी पाणपोई, भोजनदान, चहा, नाष्टा आदी सुखसुविधा विविध मंडळांनी, संघटनानी केल्या होत्या, तसेच महाड शहर वाहतूक पोलीसांनी मोठ्या वाहनांची पार्किंग ही बाहेरच केल्याने चवदार तळे क्रांतीभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केवळ जनसागार, विविध पुस्तकांचे, वस्तूचे, कपड्याचे स्टाँल दिसत होते. तर महाड परिसराला वाहनतळांचे स्वरूप प्राप्त झाले होते, अपेक्षेपेक्षा दुप्पट, तिपटीने जनसागार महाड येथे आल्याने सर्व उपाययोजना कोलमडून गेल्या होत्या असे येथील संतोष मनेर यांचे म्हणणे आहे.






No comments:
Post a Comment