वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई !! "९० रिक्षाचालकांकडून १ लाख ५० हजारांचा दंड वसूल"
कल्याण, बातमीदार, दि. १२ : काही महिन्यांपासून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूल, रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर येणाऱ्या प्रवाशांना अडथळा नको. यासाठी रेल्वे स्थानक भागातील पालिकेची कामे पूर्ण होईपर्यंत रिक्षाचालकांनी रेल्वे स्थानक परिसरात गर्दी करू नये, असे वारंवार आवाहन वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक महेश तरडे यांनी रिक्षाचालकांना केले आहे. तरीही वाहतूक पोलिसांची नजर चुकून अनेक रिक्षाचालक रेल्वेस्थानक भागात येत असल्याने, अशा चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी घेतला.आज शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात कल्याणचे ऊपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण आणि वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी १० ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तीने रिक्षा चालवणाऱ्या ९० रिक्षाचालकांवर शुक्रवारी दिवसभरात कारवाई करून, १ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


No comments:
Post a Comment