महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड नामदेव गावडे यांचे दुःखद निधन !
कोल्हापूर, बातमीदार, दि.२३ :
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सहसचिव व राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड नामदेव गावडे यांचे दि. २३ मार्च २०२२ रोजी रात्री १२.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ६३ वर्ष होते.
आज बुधवार दि. २३ मार्च रोजी दुपारी ठीक २.३० वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बिंदू चौक, कोल्हापूर येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ठीक ४ वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील बीड या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
शेतकरी नेते म्हणून सुपरिचित असलेले कॉम्रेड नामदेव गावडे हे विद्यार्थी दशेपासून कम्युनिस्ट चळवळीत कार्यरत आहेत. सुरवातीच्या काळात त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया युथ फेडरेशनचे नेतृत्व करत, कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात युवकांचे मजबूत संघटन उभे केले. याकाळात युवकांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी लढे उभारले. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनून, त्यांनी कामगार व शेतकरी वर्गासाठी आपले आयुष्य समर्पित केले. गेल्या अनेक वर्षांपासून ते किसान सभेचे नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर लढे उभारून, त्यांना हक्क मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनातही त्यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली होती. अलीकडेच सहकार वाचविण्यासाठीचा लढा त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर उभारण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी- कासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपदही त्यांनी काळी काळ भूषिवले आहे. शेतकरी प्रश्नांवर त्यांनी अनेक पुस्तिका लिहिल्या आहेत.

No comments:
Post a Comment