कातळवाडीचा अनोखा शिमगोत्सव आजही कायम ; देवीचे शिंपणे सोहळ्याने उत्सवाची सांगता !
कोकण - (दिपक कारकर) :
चिपळूण तालुक्यातील अंतिम टोकाचं गाव असणाऱ्या मुर्तवडे कातळवाडी गावचा भक्तिमय/ धार्मिक व पारंपरिक पद्धतीने प्रतिवर्षी साजरा होणारा शिमगोत्सव मोठया दिमाखदार वातावरणात पार पडला. दोन वर्षे कोव्हिड-१९ च्या काळात शासकीय नियमानुसार शिमगा उत्सवाचा आनंद न मिळालेल्या भाविकांनी ह्यावर्षी मात्र गावी हजेरी लावत या सोहळ्यात दंग झाले. या गावचं कातळवाडी ग्रामिण- मुंबई मंडळ आणि महिला मंडळ यांच्या अथक परिश्रमाने व तरुणाईच्या नवनव्या संकल्पनेतून शिमगोत्सवाची भव्यता अधिकाधिक वाढली होती. अनेकांनी गावच्या शिगोत्सवाला आर्थिक/ भेटवस्तू स्वरूपात योगदान दिले, या साऱ्या देणगीदारांचे ग्रामिण-मुंबई मंडळातर्फे ग्रामदेवता फोटोफेम देऊन अभिनंदन केले. या गावचं अफाट श्रध्दास्थान व ग्रामदैवत असणाऱ्या आई वाघजाई देवीच्या मंदिरी आकर्षक रंगरंगोटी, विद्युतरोषणाई, रांगोळी, गुलाल, ढोल-ताशे, सनईच्या गजरात हे गाव ६-७ दिवस दुमदुमून गेले.
गावच्या वनराईतून नाचत- गाजत माड आणणे, तो उभा करणे, दुसऱ्या दिवशी धुळीवंदन होत या दिवशी जत्रा भरते, पहाटे होम लागतो, होमाभोवती पालखी प्रदर्शन होऊन, बाजूच्या गावची अनेक भाविक मंडळी या उत्सवात सामील होऊन पालखी नाचविण्यात दंग होऊन जाते. रात्रौ सहाण भरणे व गावचं बहुरंगी नमन असा कार्यक्रम होतो. मानकरी/ गावकरी यांच्या घरी पालखी जाऊन तद्नंतर वाडीतील प्रत्येकाच्या घरोघरी प्रथम गावचे खेळे व नंतर पालखी जाणे हा कार्यक्रम सुरू होऊन, देव मानात जातो, तिथं मनोरंजनपर नमन कार्यक्रम वाडीतील तरुण मंडळी सादर करते.
गेली अनेक वर्षे गावची जुनी परंपरा गावातील वरिष्ठ व तरुणाई जपत साजरा होणारा शिमगोत्सव आयोजन नेत्रदीपक करते. सायंकाळी पालखी सहाणेवर जाताना बेन्जो पार्टी सहित ढोल, ताशे, सनई यांच्या मधुर संगीताने वाडीतील लहान- थोर, महिला, भाविकांची जणू गर्दीच उसळते. शेवटचा दिवस देव घरभरणीस जाणे अर्थातच भक्तिमय वातावरणात देवीच्या पालखीचा शिंपणे कार्यक्रम पार पडला जातो. असा हा आजही कायमच आनंदाचा अमाप उत्साह वाढविणारा कातळवाडीचा शिमगोत्सव वाडीतील मानकरी-गावकरी, महिला मंडळ, मुंबईकर चाकरमानी, लहान बालके, यांच्या सहकार्याने यादगार राहील असा पार पडला.



No comments:
Post a Comment