ऐन शिमग्यात 'म्हारळ पोलिस चौकी'चे होणार बारसे !!
कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या कित्येक वर्षांपासून बिना नावाची राहुन ही अनेक भल्या बु-या घटनांची साक्षीदार ठरलेल्या म्हारळ पोलीस चौकीचे अखेर "बारसे" होणार असून याचे कारण ठरले ते शिवसेना व पोलिसांमधील शाब्दिक युद्ध ! असे असले तरी यातून समाधान कारक बाब म्हणजे म्हारळ, वरप, कांबा या मोठ्या गावासाठी एक सुसज्ज नवीन पोलीस चौकी मिळाली आहे.
कल्याण तालुका पोलीस ठाणे हे मांडा टिटवाळा येथे आहे, यांच्या अंतर्गत खडवली, गोवेली आणि म्हारळ पोलीस चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत, पण तरीही झपाट्याने वाढणारी लोकसंख्येपुढे हे पोलीस बळ अपुरे व कमी पडू लागले आहे. अशातच म्हारळ गावाची लोकसंख्या १ लाखांच्या आसपास गेली आहे, अशातच एमआयडीसी रोड समोरील पोलीस चौकी मोठा आधार ठरत होती. १० बाय १० या पोलीस चौकीत बसायला देखील जागा होत नव्हती, मग आरोपीला कुठे कसे ठेवायचे ही मोठी अडचण ठरत होती, काही मोजकेच अधिकारी सोडले तर आजपर्यंत या चौकीला एकही कायम स्वरूपी २४ तास सेवा देणारे पोलीस अधिकारी मिळाले नाहीत, त्यामुळे या परिसरातील गुन्हेगारी भयानक वाढलेली आहे, ४/५ पोलीस ऐवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी कसे पुरणार? त्यामुळे गावातील अनेकांनी येथे नवीन पोलीस ठाणे व्हावे म्हणून पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदने, तक्रारी केल्या आहेत.
तसें पाहिले तर म्हारळ येथील जुनी पोलीस चौकीला २०/३० वर्षे झाली आहेत. या चौकीला अनेकांनी सहकार्य केले आहे. ही जागा प्रांतिक सरकारची असल्याचे बोलले जाते, नंतर येथे सेवा सोसायटी होऊन ती रिजन्सी ग्रुपने घेतली, या पोलीस चौकीत पावसाळ्यात पाणी भरत असल्याने तसेच अनेक अडचणी येत असल्याने रिजन्सी ग्रुपने म्हारळ गावाच्या प्रवेशद्वारासमोर एक सुसज्ज पोलीस चौकी बांधून दिली आहे. त्यामुळे जुन्या पोलीस चौकीतील सामान या नवीन चौकीत ने आण करित होते.
अशातच एक त्रयस्थ व्यक्ती या पोलीस चौकीस कुलूप लावत असल्याचे वृत्त वा-यासारखे परिसरात पसरले असता, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली,व म्हारळ पोलीस चौकीस शिवसेनेचे झेंडे व बँनर लावले, त्यामुळे वातावरण तापले, याच वेळी कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी हे येथे आले व तेव्हा शिवसेना पदाधिकारी व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी जो गैरसमज झाला तो समोर आला व वातावरण शांत झाले. परंतु या निमित्ताने गेल्या कित्येक वर्षांपासून म्हारळ पोलीस चौकीस न मिळालेले नाव मात्र नक्कीच मिळणार व ते कल्याण तालुका पोलीस ठाणे अंतर्गत म्हारळ पोलीस चौकी निवारा केंद्र, असे असेल ! या संदर्भात कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांना विचारले असता, ही म्हारळ पोलीस चौकी आमचीच असल्याचे व आपण योग्य भूमिका घेतल्याचे सांगितले. तर चौकी जुनी की नवीन हे महत्त्वाचे नाही तर येथे कायमस्वरूपी २४ तास सेवा देणारे पोलीस अधिकारी नेमावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.




No comments:
Post a Comment