म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून हरविल्याची तक्रार, कामाची बोंबाबोंब ?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत असलेल्या म्हारळ ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण वाघचोडे हे या ना त्या कारणांमुळे ग्रामपंचायतीला गैरहजर राहतात, त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन गावातील भाजपाचे ओबीसी चे अध्यक्ष मंगेश केणे यांनी ग्रामविकास अधिकारी हरविल्याची तक्रार कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिका-याकडे केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर शहाराला लागून आणि कल्याण नगर महामार्गावर तालुक्यातील सर्वात मोठे म्हारळगाव वसले आहे, झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे आज या गावाची लोकसंख्या लाखाच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे येथील समस्या देखील तशाच वाढलेल्या आहेत, पाणी, कचरा, सांडपाणी, रस्ते, अनाधिकृत बांधकामे असे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय घरपट्टी लावणे, बदलणे,टँक्स भरणे,काही परवानगी मिळविणे, बचतगटाच्या अडचणी अशा विविध कामासाठी दररोज हजारो ग्रामस्थ कार्यालयात ये जा करतात, अशा वेळी ग्रामपंचायत कार्यालयात लोकप्रतिनिधी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित असणे आवश्यक असते, पण म्हारळगाव याला अपवाद ठरत आहे.
म्हारळग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी ची सत्ता आहे, तर भाजप विरोधकांच्या भूमिकेत आहेत, एकूण १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायती मध्ये फारच विचित्र स्थिती निर्माण झाली आहे, १२ विरुद्ध ५ यामध्ये भाजपाकडे १२ तर शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांच्या कडे ५ त्यामुळे कोणताही निर्णय घेताना बोंबाबोंब झाली म्हणून समजा!
याचाच फायदा ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण वाघचोडे यांनी घेतला, असा आरोप सरपंचांनी करून बहुसंख्य सदस्यांचा विरोध हे कारण पुढे करत अनेक विकास कामांना तिलांजली दिली, बिले काढण्यास असमर्थता दर्शविली,यातून सरपंच ,उपसरपंच यांचे व ग्रामविकास अधिकारी यांच्यात खटके उडले, अनेक सभाना गैरहजर राहिल्याने सरपंच श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे यांनी डझनभर तक्रारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भाऊसाहेब दांडगे यांच्या कडे केल्या आहेत. इतकेच नव्हे तर म्हारळ ग्रामपंचायतीने खर्च करून उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, उद्घाटन प्रंसगी १४ एप्रिल दिवशी देखील हे महाशय गैरहजर राहिले होते. याविषयी म्हारळ शहर शिवसेना प्रमुख डॉ सोमनाथ पाटील यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.
त्यामुळे यांच्या राजकारणाचा फटका सर्व समान्य नागरीकांनसह ग्रामपंचायत मधील कामगार व कर्मचारी यांना देखील बसत आहे, कर्मचाऱ्यांचा पगार,घरपट्टी, पाणी पट्टी, वसूली, ही थांबली आहे, त्यांनी देखील गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या कडे केली आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी व आधिकारी सक्षम नसेल तर काय होते, याचे ताजे व जिंवत उदाहरण म्हणजे "म्हारळ ग्रामपंचायत"होय!
पावसाळा तोंडावर आला आहे, पावसाळ्यापुर्वीची कामे अद्याप झालेली नाही, पावसाळ्यात सर्वाधिक पाणी म्हारळगावात भरत आहे, अशा वेळी प्रशासकीय अधिकारी वारवांर' दाडी'मारत असेल तर लोकांच्या संभाव्य नुकसानीची जबाबदारी कोणाची? या सर्व गोष्टींचा विचार करून आपण गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या कडे म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण वाघचोडे हे हरविल्याची तक्रार केली आहे. असे गावातील भाजपाचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष मंगेश केणे यांनी केली आहे. तर ग्रामविकास अधिकारी वाघचोडे यांच्या विरोधातील तक्रारी इतक्या वाढल्या आहेत की, जिल्हा परिषदेच्या बैठकीत गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी एक तर माझी बदली करा, अन्यथा बाळकृष्ण वाघचोडे यांची तरी करा, अशी उद्विग्नता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भाऊसाहेब दांडगे यांच्या कडे व्यक्त केली असल्याचे खात्री लायक वृत्त आहे. याबाबत कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी तसेच म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण वाघचोडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
प्रतिक्रिया :
गावात पाणीटंचाई, कचरा उचलण,बेकायदेशीर बांधकामे,पावसाळ्यापुर्वीची कामे अशा समस्या असताना ग्रामविकास अधिकारी गायब आहेत, म्हणून ते हरविल्याची तक्रार केली आहे.-मंगेश केणे, (अध्यक्ष, ओबीसी युवा मोर्चा, उल्हासनगर,)
No comments:
Post a Comment