कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील अनधिकृत ढाबे तातडीने बंद करा - हॉटेल व्यावसायिकांची मागणी
कल्याण, हेमंत रोकडे, दि.२५ एप्रिल :
कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरांमध्ये सुरू असणारे अनधिकृत ढाबे तातडीने बंद करण्याची आग्रही मागणी हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे. कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकांनी आज कल्याणात बैठक घेतली.
गेली २ वर्षे आधीच कोवीडमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोणतेही उत्पन्न नसतानाही लाईट बिल, कामगारांचा पगार, शासनाचे विविध कर आणि परवाना नूतनीकरण शुल्क हॉटेल व्यावसायिकांना भरावेच लागले आहे. तर कोवीड निर्बंध पूर्णपणे उठवल्याने हॉटेल व्यावसायिकांचा आर्थिक गाडा आताशी कुठे हालचाल करू लागला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत कल्याण डोंबिवलीसह इतर शहरात सुरू झालेल्या अनधिकृत ढाब्यांनी हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे आवाहन उभे केले असल्याचे यावेळी विविध हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
तर आम्ही सर्व जण शासनाचे रीतसर सर्व कर, देयके भरत आहोत. याउलट कोणतेही शासन शुल्क किंवा परवानगी घेता अनधिकृत ढाबे सर्रासपणे सुरू असून त्यांना कोणाचे संरक्षण आहे? असा संतप्त सवाल हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला. तसेच या अनधिकृत ढाब्यांमुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.
याबाबत आता शासन आणि त्यांचा संबंधित विभाग कशी कार्यवाही करते हे लवकरच स्पष्ट होईल.

No comments:
Post a Comment