Saturday, 2 April 2022

महापुरातील कोकण दुष्काळाच्या वाटेवर !!

महापुरातील कोकण दुष्काळाच्या वाटेवर !!


"महाराष्ट्रात" सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो, याची नुकतीच प्रचीती यावर्षीच्या पावसाळ्यात कोकणात सर्वत्र झालेल्या पूरपरिस्थितीवरून लक्षात आलीच असेल. तरीही आज कोकणातील काही भागातील जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे,

*प्रगत महाराष्ट्रात महिलांच्या डोईवर हांडे ही मोठी शोकांतिका.*


कोकणातील गाव वाडीवस्त्यांवर प्रगतशील महाराष्ट्रात आजही पाण्याचे टँकर धावत असतील आणि महिलांच्या डोईवर हांडे दिसत असतील तर या पेक्षा शोकांतिका ती कोणती? याचा विचार आता कोकणी जनमानसात होणे गरजेचे आहे ! 

कोकणातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना होण्यासाठी कोकणात पावसाच्या पाण्याचे नियोजन होणे फार आवश्यक आहे.


*नियोजनाच्या अभावी अनेक नद्या कोरड्या*

कोकणाला लाभलेले उंच डोंगर आणि याच डोंगर माथ्यावर पडणारे पावसाचे पाणी नियोजन अभावी  थेट नदी -नाल्यातून समुद्राला मिळते. मोठया नद्या वगळता अन्य गावातून वाहणाऱ्या नद्यांना जेमतेम  नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंतच पाणी उपलब्ध असते, पुढे पावसाळा सुरू होईपर्यंत नद्या कोरड्या असतात. त्यामुळे साहजिकच कोकणात जमनी ओलिताखाली नसल्याने आजही बारामहिने शेती करण्याचेही प्रमाण खूप कमी आहे.

*प्रशासनाकडून सहकार्य आणि ग्रामस्थांचे श्रमदान फार महत्त्वाचे*

भविष्यात पाणी टंचाई होऊ नये यावर जनजागृती होण्याबरोबरच सर्वांनी एकत्र येऊन उपाय योजना करणे काळाची गरज आहे. गावपातळीवर श्रमदानातून नदी-ओढे पात्रात दगड मातीचे छोटे- मोठे बंधारे बांधून अथवा  प्रशासनाची मदत घेऊन कायमस्वरूपी एखाद्या ठिकाणी धरण बांधण्यात यावे. त्यातून आपल्या गावाला पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा तर उपलब्ध होईलच, त्याचबरोबर पाणी जिरवण्याचाही प्रक्रिया हेतू साध्य होईल.  त्याचा सर्वाधिक फायदा आजूबाजूला असणाऱ्या विहीर आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास निश्चित होईल.

*गावातील नदी प्रदूषणमुक्त ठेवणे ही आपली जबाबदारी*

नदीच्या पात्रात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही यावर विशेष लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे. काही गावामध्ये पाणवठे आणि नैसर्गिक (स्त्रोत) जिवंत झरे वाहत आहेत, अशा ठिकाणी शक्य तेवढे नियोजन करून सदरचे ठिकाण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

*कोकणातील चिरेखाणींचा जलस्त्रोत म्हणून वापर व्हावा.*     

कोकणात मोठ्या प्रमाणावर चिरेखाणी पाडल्या जात आहेत. ज्या ठिकाणी चिरेखाणी पाडल्या जात आहेत तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भूजल सर्वेक्षण करून शक्य असल्यास कोकणातील जास्तीत जास्त चिरेखाणी जलस्त्रोत बनवून जी गावे जास्त दुष्काळाची झळ सोसत आहेत अशा गावांना त्याचा नक्कीच फायदा होईल.

*शुद्ध व शाश्वत पुरेसे पाणी उपलब्ध होणे हा नागरिकांचा संविधानिक अधिकार*

शुद्ध व शाश्वत पुरेसे पाणी मिळणे हा  प्रत्येक नागरीकाचा जगण्याचा  व उपजीविकेचा हक्क समजून एक सुजाण नागरिक म्हणून किमान एवढे आपण आपले कर्तव्यच समजू या !  कोकणात पाण्याची आणीबाणी होणार नाही सर्वानी वचनबद्ध राहू या.….!


*✒️ लेखक: उदय गणपत दणदणे* 

(ठाणे) मु. निवोशी पो.पालशेत ता. गुहागर जि. रत्नागिरी. मोबाईल नंबर- ८२७५६२७६३



No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...