प्रभाकर साईलच्या मृत्यू संशयस्पद, चौकशी होणार --दिलीप वळसे-पाटील.
भिवंडी, दिं,२, अरुण पाटील (कोपर) :
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या वर्षी क्रूझ ड्रग्ज केसमध्ये सापडला होता. एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रभाकर साईल याच्या मृत्यूने अनेक चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रभाकर साईलच्या मृत्यूची पोलीस चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले असून, तसे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
प्रभाकर साईलला हृदयविकाराच्या झटका आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर साईल याच्या खुलाशांमुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. प्रभाकर साईलचा मृत्यू नैसर्गिक नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभाकर साईलच्या मृत्यूची पोलीस चौकशी होणार असल्याचे सांगितले.
ही अतिशय अचानक घडलेली घटना आहे आणि या संदर्भात निश्चित प्रकारे संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यासाठी मी आदेश दिलेले आहेत, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. प्रभाकर साईल यांचा मृत्यू चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती त्यांचे वकील वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली होती.
दरम्यान, प्रभाकर साईल यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे प्रभाकर यांच्या पत्नी पूजा यांनी सांगितले. ते स्वत: चालत गेले. त्यांचा ECG काढला गेला. डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. मग ते चंद्रा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. त्यांना नंतर अटॅक आला आणि पाच मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला तेथील सीसीटीव्हीही दाखवला. त्यात सर्व दिसत आहे. आम्हाला काहीही शंका नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, असे पूजा साईल म्हणाल्या.

No comments:
Post a Comment