न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दांपत्याची आता एफ आय आर रद्द करण्यासाठी धावपळ !!
भिवंडी, दिं,२५, अरुण पाटील ( कोपर) :
कित्येक दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवास स्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टहास धरणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना वांद्रे (मुंबई ) येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थाना समोर हनुमान चालीसा अट्टाहास अंगलट आल्याने आता राणा दाम्पत्याने जामीनासाठी धावाधाव सुरु केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी आता एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्यावर १२४ अ (राजद्रोह) कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर तत्काळ सुनावणीस नकार दिल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. राणा दाम्पत्याच्या जामिनावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. रवी राणा यांना तळोजा कारागृहात आणि नवनीत राणा यांची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे.
धार्मिक कारण पुढे करून दोन गटांमध्ये वैमनस्य वाढवणे व एकोप्याला बाधा निर्माण केल्या प्रकरणी उपेंद्र लोकेगावकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राणा दाम्पत्या विरुद्ध १५३ अ, १२४ अ, ३४ भादंवि सहकलम ३७ (१), १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यांत त्यांना त्यांच्या खार येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली होती.
अटकेनंतर या दोघांनाही रात्री उशिरा सांताक्रूझ लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. दुपारी १२ वाजता त्यांना वांद्रे (मुंबई )येथील स्थानिक न्यायालयात नेण्यात आले. साडेबारा वाजता न्यायालयात दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. दीड वाजता युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आला आहे. खार (मुंबई ) पोलिसांनी दोघांना शनिवारी अटक केली होती. रविवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या घरी जायचे असेल तर परवानगी आवश्यक असते. ती घेतलेली नव्हती. शिवाय मुख्यमंत्र्यांसाठी या दाम्पत्याने अपशब्द वापरले होते.
No comments:
Post a Comment