मुलांनो, बापाचे मालक होऊ नका.. .! "परळी आगाराच्या वाहकाचा सल्ला"
बीड, अभिजित भोसले : प्रवासासाठी लेकरांनी दिलेले अवघे ५५ रुपये घेऊन निघालेली वयोवृद्ध व्यक्ती, बसमध्ये जेव्हा भाडेवाढ झाली आहे आणि तिकिटाला ६० रुपये लागतात, असे कळल्यानंतर चेहऱ्यावरची हताशा लपविताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात तराळलेले अश्रू एका वाहकाला अस्वस्थ करून गेले. त्याच अस्वस्थतेतून " तिकिटाचे ५ रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही, पण मुलांनो, बापाचे मालक होऊ नका!" हा वाहकाने दिलेला सल्ला सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कुपोषित होत चाललेल्या समाजव्यवस्थेने आणि जर्जर झालेल्या कुटुंब व्यवस्थेने याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
ही घटना आहे दोन दिवसापूर्वीची,परळी आगाराचे वाहक गणेश राडकर लातूर-परळी बसवर कर्तव्यास होते. दुपारी 2 वाजता लातूरहून बस परळीकडे निघाली. यावेळी गाडीत एक आजोबा येऊन बसले. गाडी काही अंतरावर गेल्यानंतर वाहक राडकर यांनी तिकीट काढायला सुरुवात केली. त्या आजोबांना तिकिटाचे पैसे मागितले, यावेळी त्यांनी हाफ तिकिटं सांगत ५५ रुपये हातावर टेकवले, आणखी ५ रुपये द्या असं राडकर त्यांना बोलले. तिकीट तर ५५ रुपये असताना ६० कसे असं त्या आजोबानी विचारले. यावेळी वाहकाने त्यांना ' तिकीट वाढल्याचे सांगितले. यावेळी त्या आजोबांनी खिशात हात घालून पाहणी केली, पण पैसे नसल्याने त्यांनी मुलाने एवढेच पैसे खर्चीसाठी दिल्याचे सांगितले, हे सांगताना त्या आजोबाच्या नजरेत एक प्रकारची "हताशा" होती. ती हताशा आणि चेहऱ्यावरची हतबलता, डोळ्यात तराळणारे पाणी वाहक राडकर यांना अस्वस्थ करून गेले. 'खरं तर एवढ्या उन्हात प्रवास करताना तहान, भूक लागू शकते. असं विचार न करता केवळ ५५ रुपये बापाच्या हातावर टेकवणाऱ्या अविचारी मुलाचा विचार सतत त्या वाहकाच्या मनात घोळत होता. शेवट न राहवून त्या वाहकाने आपलं मन सोशल मीडिया वर व्यक्त केले. "तिकिटाचे ५ रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही, पण मुलांनो, बापाचे मालक होऊ नका!" असा सल्ला नव्या पिढीला दिला आहे.
आज आपण मोठे झालो. आपल्याकडे वडिलांनी व्यवहार दिला तर आपण बापालाच मोजके पैसे द्यावेत ? ज्या बापाने लहानपणी सर्व लाड पुरवले, पैसे असोत- नसोत मागेल तितके म्हणेल तेंव्हा पैसे पुरवले ! त्याच बापावर आज अशी वेळ.. मोजून तिकीटा एवढेच पैसे ...? सध्या उन्हाळा सुरु आहे, तहान लागू शकते, अशा वेळेस त्या वयस्क माणसानं काय करावे.. कोणाला मागावे..? ५ रू संबंधित वाहकासाठी मोठी रक्कम नव्हती, ती त्याने भरली, पण अशी परिस्थिती पाहून त्या वाहकाने आजकालच्या मुलांनी आपल्या बापाचे " मालक " बनू नका ! असा दिलेला सल्ला म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला लगावलेली चपराक आहे.
No comments:
Post a Comment