रायते ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत होर्डिंग्ज विरोधात कारवाईची मागणी, तहसील कार्यालयात पैसे चारुन काम केल्याचा गंभीर आरोप ?
कल्याण, (संजय कांबळे) : रायते मानिवली रस्त्यावर आणि कल्याण मुरबाड महामार्गाच्या शेजारी असलेल्या गोचरण या राखीव भूखंडावर कोणी अज्ञाताने मोठे लोंखडी चॅनेल गाडून होर्डिंग्ज तयार केले असून हे सर्व अनाधिकृत काम कल्याण तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना २/४ लाख रुपये देऊन केल्याचा गंभीर आरोप परहित चँरेटेबल सोसायटीने केला असून यामुळे 'भ्रष्टाचार' मुळेअधिच बदनाम झालेले कल्याण तहसील कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.
कल्याण मुरबाड महामार्गाच्या शेजारी व रायते-मानिवली रस्त्यावर काही दिवसांपासून मोठे होर्डिंग लावण्याचे काम सुरू होते. उल्हास नदीच्या काठावर व होराईन शाळेच्या समोर भूमापन क्रमांक व उपविभाग ६/१ ही गोचरण राखीव जमीन आहे. येथून संत आसाराम बापू आश्रम मानिवली असा रस्ता तयार केला आहे. या जमिनीवर काही दिवसापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. रायते मानिवली रस्त्याच्या कडेला लोंखडी चँनेल रोऊन मोठे होर्डिंग दोन्ही बाजूंनी तयार करण्यात आले आहे. याला कोणत्याही प्रकारची रायते पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायत ची परवानगी किंवा कल्याण तहसीलदार याची अनुमती घेतली नसल्याचे परहित चँरेटेबल चे अध्यक्ष विशाल गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच या जागेचे प्रकरण बाँम्बे उच्च न्यायालयात विचाराधीन असताना येथे अनाधिकृत होर्डिंग्ज उभारुन न्यायालय व शासनाचा अपमान करून अपराध केला आहे, असे सांगून कल्याण तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-याना २/४ लाख रुपये देऊन हे काम केल्याचा गंभीर आरोप ही त्यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी कल्याण तहसील कार्यालयातील महिला तलाठी व तिचा खाजगी लिपिक यांना पुरग्रस्तांना नुकसानीपोठी मिळालेल्या शासकीय मदतीतून 'लाच' घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते, यावेळी आरोपी याने हे पैसे वरपर्यंत द्यावे लागतात असे सांगितले होते, मंडल अधिकारी, निवासी नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या कडे संशयाने पाहिले जात होते, या अगोदरही तहसीलदार व लिपिक यांना लाच प्रकरणी पकडण्यात आले होते. त्यामुळे कल्याण तहसील कार्यालयाची मोठ्या प्रमाणात बेअब्रू झाली होती.
आता पुन्हा या होर्डिंग्ज च्या विषयावरुन परहित सोसायटीचे अध्यक्ष विशाल गुप्ता यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दागंडे यांच्याकडे केली आहे, या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर तसेच कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
प्रतिक्रिया :-
आमच्या ग्रामपंचायत कडून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही, तरीही जुने काही असेल तर पाहतो- नितीन चव्हाण (ग्रामसेवक, रायते पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायत)
आम्ही परवानगी दिलेली नाही- श्री जाधव, तलाठी, रायते सजा, ता. कल्याण.
तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी असे भ्रष्टाचार करतात, हे निंदनीय व चुकीचे आहे, विशाल गुप्ता (अध्यक्ष, परहित, चँरेटेबल, सोसायटी)
No comments:
Post a Comment